नागपूर : प्रतिनिधी
समाजात जे घडते, ते चित्रपटात दाखवले जाते. पण कधी-कधी चित्रपटात जे दाखवले जाते, ते प्रत्यक्षातही घडल्याची प्रचिती चंद्रपूरकरांना आली आहे. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट आपण पाहिला असेलच. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मकरंद अनासपुरे अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणतो आणि अधिकाऱ्यांची ही चिल्लर मोजताना चांगलीच धांदल उडते. असाच काहीसा मजेदार प्रकार चंद्रपुरात घडला आहे. गृहकर भरण्यासाठी एका व्यक्तिने चक्क १४ हजार ८०८ रुपयांची चिल्लर आणली आणि अधिकार्यांची चांगलीच भंबेरीच उडाली.
चंद्रपूर महापालिकेने नागरिकांना गृहकराच्या नोटीस पाठवल्या आहेत. कराचा वेळेत भरणा न केल्यास पालिकेकडून जास्तीचे व्याज आकारले जात आहे. त्यामुळे नागरिक कर भरण्यासाठी घाई करत आहेत. हाच करभरण्यासाठी दादमहल वॉर्डातील रहिवासी रंजन नंदाने यांनी पैशाची जुळवा जुळव कशी केली ते जाणून घेणे मनोरंजक ठरणार आहे.
रंजन नंदाने यांचा फेरीचा व्यवसाय असून त्यांची परिस्थितीही हालाखीची आहे. कर भरण्यासाठी रोख रक्कम नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलांनी २ ते ३ वर्षापासून जमवलेल्या सुटट्या पैशांचा गल्ला (पिगी बँक) फोडला आणि ही सर्व चिल्लर महापालिकेत जमा करण्यासाठी आणली. त्यात १,२,५ आणि 10 रुपयांची नाणी होती. ही सर्व रक्कम जवळ जवळ १४ हजार ८०८ रुपयांची होती. ही रक्कम त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या टेबलावर नेऊन ठेवली.
हा प्रकार पाहून कर विभागाचे कर्मचारीही चकीत झाले. पण यासुटट्या नाण्यांना कायदेशीर मूल्य असल्याने पालिका कर्मचारी ही रक्कम नाही ही म्हणू शकले नाहीत. वरिष्ठांना विचारून त्यांनी शेवटी सुटट्या पैशांच्या स्वरुपातील रक्कम जमा करुन घेतली. महापालिकेत घडलेला हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला होता.