Tue, Aug 20, 2019 04:06होमपेज › Vidarbha › कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा : शेट्टी

कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा : शेट्टी

Published On: Dec 25 2017 6:53PM | Last Updated: Dec 25 2017 7:08PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

आज समाजसेवेचे बाजारीकरण झाले आहे. मार्केटिंगच्या माध्यमातून अनेक समाजसेवक गल्लाभरू समाजसेवा करीत आहेत. समाजातील ही विकृती उखडून फेकण्यासाठी समाजाच्या वेदनांची मलमपट्टी करण्याऐवजी मूळ समस्येवरच घाव घातला पाहिजे, असे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी काल अमरावती येथे केले.

आम्ही सारे फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार नागपुरातील वेश्यांच्या मुलांना पालकत्व देणारे आणि त्यांचे संगोपन करणारे समाजसेवक रामभाऊ इंगोले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पुरस्कारप्राप्त रामभाऊ इंगोले, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अघिकारी डॉ. किरण कुलकर्णी, आम्ही सारेचे अध्यक्ष अविनाश दुधे, रमेश बोरकुटे, गजानन नारे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, कार्यकर्ता घडणे आज कठीण गोष्ट झाली आहे. निष्ठावान व नि:स्वार्थी कार्यकर्ता तर महत्प्रयासाने दिसून येतात. कार्यकर्त्यांचा त्यांच्या उमेदीच्या काळात उपयोग करून नंतर त्यांना विसरण्याचे अनेक किस्से आहेत. मात्र कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून चळवळी जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग केला पाहिजे, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, चंद्रकांत वानखेडे, अविनाश दुघे यांनीही विचार मांडले. तत्पूर्वी रामभाऊ इंगोले यांनी आम्ही सारे तर्फे एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आम्ही सारेच्या उपक्रमास पाठिंबा म्हणून प्रा. दिनेश सूर्यवंशी तसेच बाबा भाकरे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली. प्रास्ताविक अविनाश दुबे यांनी केले.