Sun, Apr 21, 2019 14:08होमपेज › Vidarbha › 'फुटबॉल नको; मराठ्यांना आरक्षण द्या' 

'फुटबॉल नको; मराठ्यांना आरक्षण द्या' 

Published On: Dec 12 2017 6:39PM | Last Updated: Dec 12 2017 6:39PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण त्वरीत लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या चार आमदारांनी आज विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले. 'फुटबॉल नको, आरक्षण द्या', अशा घोषणा देत फडणवीस सरकारने मराठा आरक्षणबाबत चालढकलपणा करू नये, असा इशारा या आमदारांनी राज्य सरकारला दिला.

शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके व उल्हास पाटील या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायर्‍यावर बसून सकाळी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. या सदस्यांना शिवसेनेच्या इतर सदस्यांनी सुद्धा साथ दिली. 'फुटबॉल नको, आरक्षण द्या', अशा घोषणा या आमदारांनी दिल्या. 

या संदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'मराठा आरक्षणाबाबत दिरंगाई होत असल्यामुळे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ न्यायालयाचे दाखले देऊन मराठा आरक्षण लागू करण्यासाठी दिरंगाई करणे योग्य नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारला आरक्षण द्यावयाचे असल्यास यातून निश्चितपणे मार्ग निघू शकतो. तामीळनाडू राज्यात ६९ टक्के आरक्षणाची मर्यादा आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत देण्यात आले आहे. हाच निकष महाराष्ट्रालाही लागू व्हायला पाहिजे.'