Tue, Jun 18, 2019 20:25होमपेज › Vidarbha › पत्रकारांसाठी आनंदवार्ता; पेन्शन लागू करण्याचा सरकारचा निर्णय

पत्रकारांसाठी आनंदवार्ता; पेन्शन लागू करण्याचा सरकारचा निर्णय

Published On: Jul 04 2018 1:09PM | Last Updated: Jul 04 2018 1:09PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

राज्यातील पत्रकारांना पेन्शन (स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी १९ जूनला बैठक घेण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर आज पेन्शन लागू करण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी हालचाली केल्या. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याने हा निर्णय होऊ शकला.

पेन्शन योजना सरकारने 2005 मध्‍ये बंद केली आहे. त्यामुळे पत्रकारांना पेन्शन देता येणार नाही. पत्रकार तर खाजगी कर्मचारी असल्याचे सांगत या योजनेची फाईल अर्थ विभागाने काही महिन्यांपूर्वी सामान्‍य प्रशासन विभागाकडे परत पाठविली होती. मात्र, 29 जूनला अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एक बैठक घेतली. माहिती जनसंपर्क विभागाचे अधिकारी, राज्‍य पत्रकार अधिस्‍वीकृती समिती व अर्थ विभागाचे प्रमुख उपस्थित होते. त्‍याच बैठकीदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी वित्‍त विभागाचे अतिरिक्‍त मुख्‍य सचिव यु.पी.एस मदान यांना फोन केला. पत्रकार  सन्‍मान योजनेसाठी पुरवणी मागण्‍यांमध्‍ये (पावसाळी अधिवेशनात) 15 कोटी रूपयांची तरतूद करावी असे आदेशच त्‍यांनी दिले. त्‍यादृष्‍टीने माहिती व जनसंपर्क विभागाने तात्‍काळ दुस-याच दिवशी अर्थ विभागास प्रस्‍ताव पाठविला. दरम्‍यान अर्थमंत्र्यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी चर्चा केली आणि 15 कोटी रूपयांची तरतूद करण्‍यावर राज्‍य मान्‍यतेची मोहर उमटली. 

आज 4 जुलै रोजी मंत्री मंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहात सादर करण्‍यात आलेल्‍या पुरवणी मागण्‍यांमध्‍ये पत्रकार सन्‍मान योजनेसाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्‍यात आली आहे.या निधीतुन सन्‍मान योजना लवकरच सुरू होणार आहे. या निमीत्‍ताने राज्‍यातील पत्रकारांची, पत्रकार संघटनांची दिर्घकाळापासुनची मागणी मान्‍य झाली आहे.