Thu, Jul 18, 2019 12:55होमपेज › Vidarbha › संतापजनक; रुग्णालाच फरशी पुसायला लावली

संतापजनक; रुग्णालाच फरशी पुसायला लावली

Published On: Jun 30 2018 9:17AM | Last Updated: Jun 30 2018 9:17AMनागपूर : प्रतिनिधी

नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये अजब प्रकार उघडकीस आला असून वॉर्ड बॉयने वार्डातील सफाई न करता रुग्णालाच साफसफाई करायला लावल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषी व्यक्तीविरुद्ध अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समजते.

वार्डातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार एका रुग्णाने सफाई कर्मचारी आणि परिचारिकेकडे केली होती. परंतु उद्दाम वार्ड बॉयने त्यालाच सफाई करण्यास सांगितले. त्या रुग्णाने दुखणे सहन करीत एक नव्हे तर दोन दिवस वॉर्डाची सफाई केली. एका सामाजिक कार्यकर्त्याने मोबाईलमधून त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल करताच खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचे बोलले जात आहे.

रोशन हिवरेकर (30, रा. ओनगर, सक्करदरा) असे त्या रुग्णाचे नाव आहे. रोशन हा ‘किंग कोब्रा युथ फोर्स ऑर्गनायझेशन’ या सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे. हिमोग्लोबिन व कॅल्शिअमच्या कमतरतेुळे अशक्तपणा आल्याने त्याला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी 23 जून रोजी मेडिकलच्या वॉर्ड क्र. 36 मध्ये भरती केले. त्याला सलाईन लावून उपचाराला सुरुवातही झाली.

रोशन उपचार घेत असलेल्या वॉर्डात मानेवाडा येथील एक वृद्ध रुग्ण उपचार घेत होता. ‘किंग कोब्रा युथ फोर्स ऑर्गनायझेशन’चे अरविंदकुमार रतुडी यांनी सांगितले की, 26 जून रोजी या वृद्धाचा मृत्यू झाला. वेळी त्याच्यासोबत कुणीच नव्हते. तब्बल एक तास मृतदेह खाटेवरच पडून होता. त्यानंतर ‘वॉर्ड बॉय’ व नातेवाईक आले. ‘वॉर्ड बॉय’ने वृद्धाला लावलेली लघवीची नळी जोरात ओढून काढली. लघवी फरशीवर सांडली. मृतदेह स्ट्रेचरवर टाकून नातेवाईकांनाच ओढण्यास सांगितले. याचवेळी परिचारिकेने सफाई कर्मचार्‍याला वॉर्ड स्वच्छ करण्यास सांगितले. परंतु त्याने स्पष्टपणे नकार दिला. कर्मचारी वॉर्ड स्वच्छ का करीत नाही, असा प्रश्न रुग्ण रोशनने केला असता, ‘तुम्हाला करायची असेल तर करा!’ असे उर्मट उत्तर परिचारिकेने दिले.

संपूर्ण वॉर्डभर दुर्गंधी पसरली होती. वॉर्डात थांबणेही कठीण झाले होते. परिचारिका, अटेंडंट, सफाईगारांची हेकेखोरवृत्ती, बेजबाबदारपणा पाहून सामाजिक कार्यकर्ता असलेल्या रोशनने स्वत:च्या हाताची सलाईन काढून ठेवत संपूर्ण वॉर्ड पाण्याने स्वच्छ करून पुसून काढला. दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारीही रोशनने वॉर्ड स्वच्छ केला. याची माहिती संघटनेला मिळताच, त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल होताच गुरुवारी प्रशासन जागे झाले. परंतु त्या कर्मचार्‍यावर किंवा परिचारिकेवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.