Mon, Jan 21, 2019 05:32होमपेज › Vidarbha › शंभर रुपयांसाठी प्रवाशाला रेल्‍वेतून फेकले

शंभर रुपयांसाठी प्रवाशाला रेल्‍वेतून फेकले

Published On: Dec 25 2017 9:06PM | Last Updated: Dec 25 2017 9:06PM

बुकमार्क करा

नागपूर : पुढारी ऑनलाईन

पेन्ट्रीकार कर्मचार्‍याने केवळ शंभर रुपयांसाठी युवकाला धावत्या रेल्वेगाडीतून बाहेर फेकल्याची घटना रविवरी पुरी-अहमदाबाद जनसेवा एक्सप्रेसमध्ये घडली. त्यानंतर आरोपी पेन्ट्रीकार कर्मचार्‍याला प्रवाशांनी पकडून बेदम मारहाण केली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचताच प्रवाशांनी आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.

जोगींदर मोहन शाहू असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो जनसेवा एक्सप्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचारी म्हणून काम करतो. पोलीस सूत्रानुसार, अरविंदकुमार चव्हाण असे डब्यातून फेकण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तो गंभीर जखमी असून त्याच्यावर भंडार्‍यात उपचार सुरू आहेत. जखमी युवक फिरस्ती असून हातात झाडू घेऊन रायपूर स्थानकावर तो एस-९ क्रमांकांच्या डब्यात चढला. जनसेवा एक्स्रपेसने गोंदिया स्थानक सोडताच जोगींदर जेवणाची थाळी घेऊन प्रवाशांना देण्यासाठी त्याच डब्यात आला. यावेळी अरविंदकुमार ५८ क्रमांकाच्या बर्थवर होता. जोगींदरच्या नकळत त्याने थाळी उचलली आणि दाराजवळ गेला. मागोमाग पोहोचलेल्या जोगींदरने जाब विचारत शंभर रुपयांची मागणी केली. युवकाने पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. यामुळे जोगींदर संतापला. कसलाही विचार न करता त्याने अरविंदकुमारला लाथ मारली. यामुळे तो थेट गाडीबाहेर फेकला गेला.

या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींपैकी दोघांनी जोगींदरला पकडले तर एकाने साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला. तोवर वेगात असलेली गाडी सुमारे दहा किमी पुढे आली होती. पाच  मिनिटांच्या थांब्यानंतर रेल्वे पुढच्या प्रवासाला निघाली. प्रवाशांनी जोगींदरला बेदम मारहाण करीत पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. भंडारा स्थानकावर पोलिस येतील असा प्रवाशांचा अंदाज होता. मात्र, कुणीही आले नाही. यामुळे पुन्हा पोलिसांना सूचना देण्यात आली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलट क्रमांक ३ वर गाडी येऊन थांबताच लोहमार्ग पोलिस तिथे पोहोचले. प्रवाशांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.