Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Vidarbha › अधिवेशनापूर्वीच विरोधकांत फूट?

अधिवेशनापूर्वीच विरोधकांत फूट?

Published On: Jul 04 2018 2:23AM | Last Updated: Jul 04 2018 1:18AMनागपूर : चंदन शिरवाळे

पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करू, मंत्र्यांच्या भानगडी बाहेर काढू, असे आव्हान देत सत्ताधार्‍यांपुढे दंड थोपटणार्‍या  विरोधकांमध्ये अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फूट पडली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे यांनी निमंत्रित केलेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्ष, माकप, समाजवादी पक्ष, लोकभारतीसह अपक्ष आमदारांनी पाठ फिरवली.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते व जोगेंद्र कवाडे यांचा अपवाद वगळता इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दांडी मारल्यामुळे विरोधकांच्या तंबूत चिंतेचे वातावरण पसरले. पहिल्याच दिवशी  लहान पक्षांनी दिलेल्या झटक्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था कोमात गेल्यासारखी झाली.  मित्रपक्षांच्या गैरहजेरीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी  सत्ताधार्‍यांवर टीका केली.शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावरही विखे यांनी टीका केली. ते म्हणाले, 89 लाख कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्‍यांची नावे मोजून घेऊ अशी बोलणारी शिवसेना आज गप्प आहे.  शिवसेनेने हातात शिवबंधन  बांधण्याऐवजी गळ्यात भाजपाचे मंगळसूत्र बांधावे. नाणार हमखास जाणार असे शिवसेना बोलत होती, पण नाणार काही गेले नाही, शिवसेनेची अब्रू मात्र गेली, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.