Mon, Aug 19, 2019 11:44होमपेज › Vidarbha › खडसेंचे कसले पुनर्वसन?, राणेंचे करू : मुख्यमंत्री

खडसेंचे कसले पुनर्वसन?, राणेंचे करू : मुख्यमंत्री

Published On: Dec 19 2017 2:01PM | Last Updated: Dec 19 2017 2:01PM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

एकनाथ खडसे हे प्रस्थापित नेते आहेत. पुनर्वसन विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नव्हे, असे सांगत खडसे यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेतले जाण्याची शक्यता नाही, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र, नारायण राणे यांना नक्की मंत्रीमंडळात घेतले जाईल आणि लवकरच ते मंत्री होतील असे मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्याचवेळी खडसे आणि राणे हे आउट स्पोकन असले, तरी पक्षासाठी असेटच आहेत, असेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत.

गुजरातमधील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजप सरकार आणखी स्थिर झाले आहे, असा दावा करताना कोलांटउड्या मारण्याच्या बेतात असलेले अनेकजण आता भानावर येतील, असा टोमणाही फडणवीस यांनी लगावला. 

हिवाळी अधिवेशनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या मुंबईतील पत्रकारांच्या सुयोग या निवासी शिबीरात अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली. गुजरातेत भाजपाला ४९.४ टक्के मते मिळाली. सुमारे पन्नास टक्के मिळवणार्‍या पक्षाला सत्तेवर येण्याची संधी देशात फार कमीवेळा मिळाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

महाराष्ट्रावर या निकालाचा काय परिणाम होईल? असे विचारले असता, आता आम्ही अधिक स्थिर झालो आहोत. काहीजण कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत होते, आता ते भानावर येतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात भाजपच सातत्याने नंबर एकचा पक्ष असल्याचे झालेल्या निवडंणुकात सिध्द झाले असून अन्य शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे सगळेच पक्ष विरोधात असतानाही भाजपने यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत. मतदारांनी भाजपाबरोबरच शिवसेनेलाही मतदान केले आहे. यामुळे अजून जनतेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याची मानसिकता नाही हेच दिसून येते, असे त्यांनी सांगितले. 

गुजरातेत राष्ट्रवादीने काँग्रेसचे मतविभाजन केले म्हणून भाजपाच्या ९९ जागा आल्या असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेमुळे काँग्रेसच्या ७४ जागा आल्या असे समजण्याइतके हास्यास्पद आहे, असा टोमणा फडणवीस यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना लगावला. सत्तेत राहूनही शिवसेनेचे सरकारविरोधी वक्‍तव्ये करणे आपल्याला पटत नसले, तरी आमचे सेनेशी चांगलेच संबंध आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.   

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत विदर्भाच्या बाहेरून आलेले लोक अधिक होते. त्यांच्या यात्रे दरम्यान झालेल्या एकाही सभेला तीनशेपेक्षा जास्त लोक नव्हते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.