होमपेज › Vidarbha › न्याय हक्कासाठी ज्येष्ठ नागरिकांचे उपोषण

न्याय हक्कासाठी ज्येष्ठ नागरिकांचे उपोषण

Published On: Jul 01 2019 6:52PM | Last Updated: Jul 01 2019 6:38PM
नंदुरबार : प्रतिनिधी

जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशाची अंमलबजावणी नंदुरबार येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्याकडून होत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडीत ज्येष्ठ नागरिकांनी प्राणांतीक उपोषण सुरू केले आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सुदाम कोठार्‍या वळवी (सोनपाडा ता. नवापूर)  रामदास बघु पाटील, रतीलाल बधु पाटील (कोळदा ता. जि. नंदुरबार) आणि निळकंठ नथु साळी (नंदुरबार) या पीडीत ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या वृद्धापकाळात मुलांकडून होणार्‍या छळाबाबत आई-वडील व ज्येष्ठ नागरिक संस्थेमार्फत निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ आणि त्या अंतर्गत नियम २०१० खाली उपविभागीय अधिकारी, नंदुरबार यांच्या कोर्टात सर्व पुराव्यानिशी अर्ज दाखल केला होता. मात्र उपविभागीय अधिकारी यांनी हा अर्ज अतिशय निर्दयीपणे खारीज केला होता. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या न्याय हक्कासाठी जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते. या अपीलाची सुनावनी होऊन अर्जदारांच्या लाभात आदेश पारित करण्यात आला होता. परंतू आदेश मिळूनही उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याकडून न्याय मिळत नव्हता. उलट  संबंधित पीडित ज्येष्ठ नागरिकांची उपासमार होत आहे. ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अन्याय आणि कुचंबना थांबविण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे आई वडील व ज्येष्ठ नागरिक  संस्थेचे  अध्यक्ष बारकू नवल पाटील यांनी म्हटले आहे.