होमपेज › Vidarbha › ‘नाणार’वरून कलगीतुरा

‘नाणार’वरून कलगीतुरा

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 10 2018 11:16PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण रद्दची घोषणा केली असताना शासनाने त्यावर मोहर का उमटवली नाही, कोकणातील जनतेचा विरोध असताना केंद्र सरकारने या प्रकल्पाचा करार कसा केला, या प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेगवेगळ्या भूमिका का, असे सवाल विचारून सभागृहाचे कामकाज अडवून धरणारे विरोधक आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मंगळवारी चांगलाच कलगीतुरा रंगला. 

उद्योगमंत्र्यांनी अभ्यासाअंती या प्रकल्पाचे जमीन अधिग्रहण रद्द केले असले, तरी शासनाचा अभ्यास अद्याप सुरू आहे. निरी, मुंबईतील आयआयटी आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल आल्यानंतरच शासन आपला निर्णय जाहीर करेल, असे ठणकावत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाविषयीच्या जनतेच्या गैरसमजुती दूर करू, कोकणातील जनतेवर प्रकल्प लादणार नाही. तसेच विरोधकांनी संरक्षणाची जबाबदारी घेतल्यास प्रकल्पासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शविलेल्या बांधवांची नावेही जाहीर करू, अशा शब्दांत आव्हान देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या भात्यातील बाण परतवून लावले. 

काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय दत्त यांनी नाणार प्रकल्पाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. उद्योगमंत्री देसाई सभागृहात असल्यामुळे या लक्षवेधीला तेच उत्तर देतील, अशी विरोधकांची अपेक्षा होती; पण या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्यामुळे देसाई आपल्या पक्षाच्या भूमिकेप्रमाणे उत्तर देतील, अशी भीती सत्ताधार्‍यांना वाटली होती. त्यामुळे या लक्षवेधीला मुख्यमंत्री उत्तर देतील, असे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सध्या ते विधानसभेतील कामकाजामध्ये व्यस्त असल्याने ही लक्षवेधी पुढे ढकलण्यात यावी, अशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी लेखी विनंती केली असल्याची माहितीही पाटील यांनी सभागृहात दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांचा निरोप आला म्हणून कामकाज पुढे ढकलणे हे सभागृहाच्या प्रथा आणि परंपरेविरोधात आहे. लक्षवेधी सुरू होण्यापूर्वीच उत्तर कोण देणार, असे आम्ही विचारले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उत्तर देणार असे का नाही स्पष्ट केले, असे सवाल विरोधकांकडून केले जात असतानाच मुख्यमंत्री सभागृहात आल्यामुळे वातावरण निवळले.