Mon, Nov 19, 2018 06:51



होमपेज › Vidarbha › दूध दर आंदोलनाला यश; शेतकर्‍यांना मिळणार २५ रुपये

दूधकोंडी फुटली; शेतकर्‍यांना मिळणार २५ रुपये

Published On: Jul 19 2018 7:37PM | Last Updated: Jul 19 2018 10:53PM



नागपूर : प्रतिनिधी

दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा निर्णय नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत झाला. 21 जुलैपासून हा निर्णय लागू होणार असून, दूध संघांना आता शेतकर्‍यांना 25 रुपये भाव द्यावा लागणार आहे. या निर्णयासंदर्भात दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत निवेदन केले.राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकर्‍यांना मिळतील. प्रत्येक दूध संघाला या पाच रुपयांचा लाभ शेतकर्‍यांना देणे बंधनकारक असेल.

पिशवी बंद दूध वगळून दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान. मात्र, अनुदान दूधपुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एकालाच मिळेल.जे दूध भुकटी उत्पादक 5 रुपये प्रतिलिटर लाभ घेतील त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही. 21 तारखेपासून सहकारी आणि खासगी दूध संस्थांना 25 रुपये प्रतिलिटर दर दिल्यास लाभ मिळेल.

दूधकोंडीचं आंदोलन अखेर मागे; राजू शेट्टींची घोषणा

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दूध दरवाढीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह काही दूध संघांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी मुख्य शहरातील दूधपुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरूच ठेवले आहे. राज्यभरात या दूध आंदोलनाचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत.

दूध उत्पादकांना लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संकलन बंदचे आंदोलन सुरू केले आहेदूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणे शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गायीच्या दुधासाठी असून, दररोज अतिरिक्‍त ठरणारे चाळीस लाख लिटर गायीचे दूध सरकारने 27 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.