Sun, Jul 21, 2019 16:52
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › ही देशाला वाचविण्याची वेळ : आंबेडकर

ही देशाला वाचविण्याची वेळ : आंबेडकर

Published On: Feb 01 2018 1:40AM | Last Updated: Feb 01 2018 12:58AMनागपूर : प्रतिनिधी

आजची परिस्थिती पाहता देशाला वाचविण्याची वेळ आली आहे. एक वर्ग होता जो गावात असूनही सत्तेपासून दूर होता आणि आताही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशाला आजही गरज आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्‍त केले.

सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, धर्माचे राजकारण होणार नाही, याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर झाला; पण पुन्हा एकदा देशात धर्माचे राजकारण सुरू होत असल्याचे चित्र आहे. हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ जी मूठभर लोकांच्या हाती होती, ती सर्वसामान्यांची कशी होईल, याकरिता प्रयत्न झाले. महात्मा गांधी चळवळीत उतरल्याने स्वातंत्र्यचळवळ सर्वसामान्यांची झाली. सामान्य दीनदलितांचे वर्चस्व वाढायला लागले. बहुजनांच्या हातात सत्ता हवी असेल, तर या देशातील आर्थिक स्रोत बहुजनांच्या हाती असायला पाहिजेत व आदर्श राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्‍त केले.