Sat, Nov 17, 2018 07:57होमपेज › Vidarbha › मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक : चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक : चंद्रकांत पाटील

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 16 2017 7:16AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचा दावा करीत विरोधकांचे याबाबतचे सर्व आरोप राज्याचे महसूलमंत्री आणि विधान परिषदेचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे फेटाळून लावले. प्रश्‍नोत्तराच्या तासात काँगे्रस सदस्य शरद रणपिसे यांच्यासह 27 विधान परिषद सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नाच्या चर्चेत शुक्रवारी सभागृहात जोरदार सवालजवाब झडले. परिणामी, प्रश्‍नोत्तरांचा तास संपल्यानंतरही सुमारे 50 मिनिटे हा प्रश्‍न चालूच राहिला. यावेळी झालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज एकदा 10 मिनिटांसाठी तहकूबही करावे लागले.

यावेळी झालेल्या घणाघाती चर्चेच्या सुरुवातीलाच शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात या प्रश्‍नाद्वारे सामाजिक विण शिवण्याचा प्रयत्न करा, फाडण्याचा नको, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्यासाठी तुम्ही संस्था आणि जागा सांगा आम्ही वसतिगृह सुरू करतो, असे आव्हानच पाटील यांनी भाई जगताप यांना दिले. ज्या ठिकाणी वसतिगृह शक्य नसेल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जागा भाड्यापोटी व्यक्‍तिगत अनुदान देण्याचीही शासनाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मराठा महामोर्चातील सर्व मागण्यांवर शासनाने कशी सकारात्मक कार्यवाही केली आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचे प्रश्‍न यासंदर्भात एक मंत्रिमंडळाची उपसमिती गठित केली असून ही उपसमिती दर मंगळवारी एकत्र भेटते. सभागृहातील विरोधी सदस्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.