नागपूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना विविध स्वप्ने दाखवून मते मागितली होती. परंतु, सत्ता येताच त्यांनी शेतकर्यांना फसविले, असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी नागपुरात शेतकरी मुक्ती संमेलनात बोलताना केला. शेतकर्यांच्या हितासाठी तयार करण्यात आलेली दोन विधेयके कोणत्याही परिस्थितीत संसदेत पारित केली जातील, असा विश्वास त्यांनी दिला.
जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे नागपूरच्या लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृह येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनात शेट्टी यांच्यासह देशातील विविध राज्यांतील शेतकरी नेते व्ही.एम.सिंग, रामपाल जाट, आर. चंद्रशेखर, नारायण मेडा, सत्यवान सिंग, रवीकांत तुपकर, विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे व आ. आशिष देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. देशभरातील 188 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीने शेतपिकाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा एवढा भाव मिळवून देण्यासाठी व शेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यासाठी दोन विधेयके तयार केली आहेत. त्यानिमित्त हे संमेलन घेण्यात आले.
नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकरी संघटनांना एकत्र यावे लागले, असे शेट्टी यांनी सांगितले. दिल्लीत 22 राज्यातील शेतकर्यांनी आंदोलन केले होते. परंतु, त्यांची दखल घेण्यात आली नाही. मध्य प्रदेशमध्ये आंदोलन करणार्या शेतकर्यांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. हा देश कृषिप्रधान असताना शेतकर्यांना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आहे. शेतकर्यांचे काम शेती करणे आहे. परंतु, न्याय्य हक्कासाठी त्यांना नाईलाजास्तव रस्त्यांवर उतरावे लागते. आंदोलन करण्यातच त्यांचा वेळ जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.