Sun, Mar 24, 2019 10:58होमपेज › Vidarbha › गाडीच्या काचांना अजूनही पानसरेंच्या रक्ताचा वास : मेघा पानसरे

गाडीच्या काचांना अजूनही पानसरेंच्या रक्ताचा वास : मेघा पानसरे

Published On: Jan 30 2018 5:01PM | Last Updated: Jan 30 2018 5:15PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

'कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या झाली तेव्हा त्यांना रुग्णालयात ज्या कारमध्ये घेऊन गेलो होतो, त्या कारच्या काचांना अजूनही पानसरेंच्या रक्ताचा वास येतो,' अशा शब्दांत पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी 'दक्षिणायन'मध्ये आपली कैफियत मांडली. 'ज्या प्रवृत्ती विवेकी विचारांना संपविण्याचा प्रयत्न करताहेत त्यांचा निषेध करण्यासाठी 'दक्षिणायन'चा प्रयत्न आहे. डॉ. एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांचे मारेकरी अद्यापही मोकटच आहेत. सरकार त्यांना पकडण्यासाठी कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाही. यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मोठा मार्च काढावा लागणार, असे मत पानसरे यांनी व्यक्त केले.

सेवाग्राम आश्रम येथील शांती भवन येथे 'दक्षिणायन'च्या तिसर्‍या अधिवेशनात मेघा पानसरे बोलत होत्या. या वेळी मंचावर राजमोहन गांधी, विद्या बाळ आणि देवी उपस्थित होते. 'दक्षिणायन'च्या 'समास-2018'मध्ये बहुभाषिक पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी गौरी शंकर यांना आदरांजली वाहिली. सुरुवातीला क्षणभर मौन धरून श्रद्धांजली वाहण्यात आली.

वाचा : पानसरे हत्या : संशयित डॉ. तावडेला जामीन (Video)

या वेळी मेघा पानसरे म्हणल्या, 'प्राध्यापक कलबुर्गी यांच्या खुनाबाबत काही शोध लागत नाही. हे पाहून गौरी लंकेश हिने प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला मोठी लढाई लढावी लागणार आहे, असे सांगितले. विवेक, सहिष्णुता आणि गरीब जे बोलू शकत नाही, अशा लोकांना संपविण्याचे सत्र, जे महात्मा गांधी यांच्यापासून सुरू झाले होत ते आता गौरी लंकेशपर्यंत येऊन पोहोचले. डॉ. दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे ज्यांचे महाराष्ट्रात अतुलनीय काम आहे. अशा लोकांचे खून आम्ही बघितले आहे. २६ ऑगस्टला आम्ही भेटलो. गौरीने तिची कैफियत मांडली. सरकारला जागे करायला एक मोठा मार्च काढावा लागणार असल्याचे तिने सांगितले आणि ५ सप्टेंबरला गौरीची हत्या झाली. 

गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही जणांच्या हत्या या सांप्रदायिक समूहाची वॉर्निंग होती. भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. पण, आवाज दाबण्याचा या प्रयत्नाला उत्तर देण्याची वेळ आली आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले. प्रज्ञा पवार म्हणाल्या, 'गौरीचा आवाज दाबण्यासाठीच तिला मारून टाकण्यात आले. समतावादी अशी जी परंपरा उजागर करीत कलबुर्गी नेत होते. त्यामुळेच कलबुर्गी यांनाही संपविण्यात आल्या. काही हत्या शासनपुरस्कृत आहे.'

इंद्रनील आचार्य यांनी बंगाली भाषेमध्ये आपले विचार मांडले. रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेमधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. के. नीला आणि राजेंद्र चेन्नी यांनी कन्नड भाषेत गौरी लंकेशला आदरांजली अर्पित केली. कन्नडमध्ये नानू गौरी, निनू गौरी, नावेल्य गौरी म्हणत गौरी आजही जिवंत असल्याचा सूर एका स्वरात शांती भवनमध्ये होता. मी गौरी तू गौरी आम्ही सर्व गौरी म्हणत गौरीचा आवाज जिवंत ठेवण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे, गौरी वॉज किल्ल्ड बिकाज शी वॉज लिव्हिंग म्हणत तिला आदरांजली वाहण्यात आली.