Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Vidarbha › अधिवेशन संपताच शिवसेनेशी ‘नाणार’बाबत चर्चा : मुख्यमंत्री

अधिवेशन संपताच शिवसेनेशी ‘नाणार’बाबत चर्चा : मुख्यमंत्री

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 18 2018 1:46AMनागपूर : प्रतिनिधी

नाणारप्रश्‍नी अधिवेशनानंतर शिवसेनेशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. मी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे शिवसेनेशी बोलून जे काय वैज्ञानिक मुद्दे आहेत त्यावर चर्चा केली जाईल, अशी  माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिली.नागपूर येथील पत्रकारांचे निवासस्थान असलेल्या ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी सोमवारी अनौपचारिकरित्या चर्चेतील प्रश्‍नांना उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, नाणारप्रश्‍नी अधिवेशनाचे तीन दिवस वाया गेले. या आठवड्यात कामकाज चालेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. नाणारबाबत अनेकवेळा मी भूमिका स्पष्ट केली आहे. 32(1) नोटीस देण्यापूर्वी या प्रकल्पाला कोणाचा विरोध नव्हता.

पहिल्या बैठकीत शिवसेना व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. मोबदला काय देणार? यावर समितीचा भर होता. त्याचे मिनिटस माझ्याकडे तयार आहेत. नंतर मात्र एनजीओ आणि काही लोकांनी तिथे आंबा होणार नाही. कोकण उद्ध्वस्त होईल, असा अपप्रचार केला. याबाबत शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तयारी केली होती, पण शिवसेनेने प्रतिसाद दिला नाही. आता अधिवेशन संपल्यावर आम्ही शिवसेनेबरोबर चर्चा करून वैज्ञानिक मुद्यांचे निरसन करू, असे ते म्हणाले.  या प्रकल्पात भारताच्या तीन कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. सौदी अरेबियाच्या अरेमको ही उपकंपनी आहे.  प्रकल्पाची जागा बदलली तरी ही रिफायनरी कोस्टलजवळ होणार, असे त्यांनीस्पष्ट केले.

हा प्रकल्प नाणार येथे होणार नाही का? असा थेट प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, मी याबाबत पुन्हा पुन्हा भूमिका स्पष्ट केली आहे. अधिक भूमिका मी स्पष्ट करू शकत नाही. शिवसेनेचे मंत्री अनंत गीते आणि खा. विनायक राऊत यांनी हा प्रकल्प आणला असे आपण यापूर्वी म्हणाला होता. पण परवा विधान परिषदेत सांगताना हा प्रकल्प मी आणला असे म्हणालात असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले, त्यांना याचे श्रेय नको असेल तर मला मिळेल, असे मिश्कीलपणे उत्तर दिले.

काकोडकर काय म्हणाले माहिती नाही 

जैतापूर आणि रिफायनरीमधील हवाई अंतर दीड दोन किलोमीटर आहे.त्यामुळे धोका पोचू शकतो असा शास्त्रज्ञ काकोडकर यांचा संदर्भ देत आ. भास्कर जाधव यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत आपले मत काय आहे? असे पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री म्हणाले, काकोडकर कधी काय म्हणाले हे मला माहिती नाही. हल्ली कोणीही काहीही कोणाचेही दाखले देत असतात. याबाबत काही संस्था अभ्यास करीत आहेत. त्यांचा अहवाल लवकरच सादर होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.