Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Vidarbha › सिडको भूखंड घोटाळा: पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जमिनी दिल्या- CM फडणवीस

सिडको भूखंड घोटाळा: पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जमिनी दिल्या- CM फडणवीस

Published On: Jul 05 2018 12:33PM | Last Updated: Jul 05 2018 1:00PMनागपूर: पुढारी ऑनलाईन/दिलीप सपाटे

नवी मुंबईतील खारघर जवळील २४ एकर जमीन आठ प्रकल्पग्रस्थाना दिली होती. मात्र ही सुमारे २ हजार कोटींची जमीन भतीजा बिल्डरला हस्तांतरीत करण्यात आली. तसेच त्याने पोलिसांच्या फौजफाटा घेवून ताब्यात घेतली. हे सरकारी आशीर्वादाशिवाय झाले नाही. या प्रकरणात थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचा संबंध असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा व या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर चोख प्रत्युत्तर देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. जमीन वाटपाचे अधिकार हे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याना आहेत. ही फाईल मुख्यमंत्री कार्यालयात आलीच नाही. आघाडी सरकारच्या काळात अशाच पद्धतीने २०० प्रकरणे झाली व या जमिनीही बिल्डरांना हस्तांतरीत झाल्या. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्या काळातही कोयना प्रकल्प ग्रस्थाना पनवेल परिसरात जमिनी देण्यात आल्या. मग त्यांचाही राजीनामा पूर्वलक्षी प्रभाववाने मागणार का? असा सवाल फडणवीस यांनी केला. 

मात्र, गेल्या पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात प्रकल्प ग्रस्थानच्या जमिनी हस्तांतरित झाल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. उलट विखे - पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भतीजा बिल्डरवरून पृथ्वीराज चव्हाण आरोप करीत आहेत. त्या भतीजा बिल्डरला चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना लोणावळा येथील मोक्याची जमीन दिली होती. त्यामुळे भतीजाचे चाचा आम्ही नाही तुम्ही आहात, असा पलटवारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी खोट्या आरोपाप्रकरणी माफी मागावी म्हणून केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले.

मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले

> आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या
> पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जमिनी दिल्या 
> विरोधी पक्षांनी अर्धी वस्तूस्थिती मांडली
> आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर जमिनीचे वाटप केले
> अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जमीन वाटपाचे अधिकार 
> कोणाच्या तरी सांगण्यावरून पृथ्वीराज चव्हाण तुम्ही असे आरोप करू नका- मुख्यमंत्री
> ही शेतजमीन असून त्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली वाटप केले. 
> सिडको घोटाळ्याशी मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांचा काहीही संबंध नाही
> मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. पण माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांनी राजीनामे दिले पाहिजेत- मुख्यमंत्री
> सिडको घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

> मागील २०० प्रकारणांचीही होणार चौकशी