Sat, Mar 23, 2019 18:10होमपेज › Vidarbha › कारमध्ये हेल्मेट घातले नाही म्हणून सरदारजींना दंड

कारमध्ये हेल्मेट घातले नाही म्हणून सरदारजींना दंड

Published On: Dec 08 2017 1:44AM | Last Updated: Dec 07 2017 8:04PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

डोक्यावर हेल्मेट घातले नाही म्हणून दुचाकीस्वाराला दंड ठोठावला जातो. पण, चक्‍क कारचालक सरदारजीला हेल्मेट घातले नाही म्हणून 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे.  

जसविंदर सिंग (प्रिंस) अर्नेजा असे दंड ठोठावलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे हेल्मेट सक्‍तीच्या नियमातून पगडीधारी शिखांना वगळण्यात आले आहे. 10 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 11.41 वाजण्याच्या सुमारास अर्नेजा हे त्यांच्या कुटुंबीयांसह तुकडोजी चौकातून त्यांच्या एमएच-49/यू-7473 क्रमांकाच्या कारने जात होते. आज त्या घटनेला आठ महिने झाले आहेत. बुधवारी सकाळी अचानक त्यांना 10 एप्रिलला हेल्मेट घातले नाही म्हणून 500 रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे सूचनापत्र नागपूर पोलिस आयुक्‍तालय, वाहतूक विभागाकडून प्राप्त झाले. पत्र वाचून त्यांना धक्‍काच बसला. कारमध्ये हेल्मेट घालणे कधीपासून सक्‍तीचे झाले? आणि त्यातही आपण शीख असताना? याबाबत त्यांनी नातेवाईक, मित्रांना विचारणा केली; पण कुणालाही माहिती नसल्यामुळे वाहतूक पोलिसाने फक्‍त चालान फाडण्याच्या प्रयत्नात हा प्रकार केला असावा, असा संशय त्यांना आला.  अर्नेजा यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडे या अन्यायाची तक्रार केल्यानंतर पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती सांगितली.