Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Vidarbha › गुजरातने दिला महाराष्ट्राला सावधगिरीचा इशारा!

गुजरातने दिला महाराष्ट्राला सावधगिरीचा इशारा!

Published On: Dec 19 2017 6:38AM | Last Updated: Dec 19 2017 6:38AM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

गुजरातचा निकाल भाजपसाठी अनपेक्षितच म्हणावा लागेल, कारण दीडशे जागांचे उद्दिष्ट असताना शंभरी गाठतानाही भाजपच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुताचा जादूई आकडा गाठता आला, तरी आगामी राजकारणात सावधगिरीचा इशाराच भाजपला मिळाला आहे. आता आम्हाला कुणालाच गृहीत धरून चालणार नाही, अत्यंत समजूतदार राजकारण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील भाजपच्याच आमदार आणि काही मंत्र्यांकडून येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थितीमधील साम्यस्थळे शोधून तेथे कोणत्या त्रुटी राहिल्या आणि त्यांचे निराकरण इथे कसे करता येईल, याचा अभ्यास महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना करावा लागणार आहे.

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर सोमवारी गुजरातच्या निकालांचेच सावट होते; पण निकालच असे होते, की ना भाजप विजयोत्सव साजरा करण्याच्या मन:स्थितीत होता, ना काँग्रेसजन! त्यामुळे सभागृहाबाहेर जितके थंड वातावरण होते, तितकेच सभागृहातही शांततेत कामकाज चालले होते. नाही म्हणायला मुख्यमंत्री आपल्या काही सहकार्‍यांसह विधानभवनाच्या पायर्‍यांवर येऊन एकमेकांना पेढे भरवण्याचा फोटो इव्हेंट करून गेले असले, तरी भाजपमधल्याच कुणाला नेका कशाचा आनंद झाला असेल, हे सांगता येणार नाही!

आज सकाळपासूनच गुजरातच्या निकालांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र, जसजसे निकालांचे कल समजू लागले, तसे भाजपच्या नेते आणि आमदारांची घालमेल सुरू झाली. काँग्रेसच्या आमदार-नेत्यांकडे गमावण्यासारखे फार काही नव्हतेच. मात्र, त्यांच्या नेत्याची, राहुल गांधी यांची ही लिटमस टेस्ट होती. या निवडणुकीत जे काही यशापयश येईल, त्यावर त्यांचे नेतेपद अवलंबून नसले, तरी त्याची मजबुती मात्र ठरणार होती. झालेही तसेच! एरव्ही विधानभवनात जरा दबकूनच येणारे काँग्रेसजन आज छाती पुढे काढून आत येत होते आणि हाच आत्मविश्‍वास या वाटचालीला पुढील दिशा दाखवणार आहे.

गुजरातमध्ये यावेळी जसा जीएसटी आणि नोटा बंदी हे मुद्दे होते, तसेच आणखी एक प्रमुख मुद्दा होता पाटीदारांचे आरक्षण! महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मूक मोर्चांनी मराठा समाजाने त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता सरकारला त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. तिथे पाटीदारांची जितकी एकजूट झाली, तितकीच एकजूट झाली, ती अन्य ओबीसी समाजाची! इथेही तसेच होऊ शकते. क्रियेला प्रतिक्रिया येऊ शकते, याचे भान भाजपच्या राज्यातील नेत्यांना ठेवावे लागणार आहे. गुजरातमध्ये भाजपला साथ मिळाली ती शहरी भागाची! शहरी मतदारांनीच भाजपची प्रतिष्ठा राखली.

महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. कर्जाफीची घोषणा करून सरकार आणि मुख्यत्वेकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी असा एक सुप्त संघर्ष उभा राहू पहात आहे. कर्जाफीसारख्या योजना ग्रामीण आणि शेतकर्‍यांसाठीच का? कामगार आणि अन्य वर्गाला का नाहीत, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. अजून या प्रश्‍नाचा आवाज तसा क्षीण असला, तरी त्याला हवा मिळाली, तर भाजपा सरकारला ते अडचणीचे ठरू शकते.