Sun, Jun 16, 2019 13:11
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › हरवलेले पती-पत्नी ‘गुगल’मुळे एकत्र

हरवलेले पती-पत्नी ‘गुगल’मुळे एकत्र

Published On: Feb 14 2018 8:30AM | Last Updated: Feb 14 2018 8:30AMनागपूर : प्रतिनिधी

खाद्यपदार्थ घेण्यासाठी नागपूरच्या रेल्वेस्थानकावर गाडीतून उतरलेली इराणी महिला गाडी अचानक सुटल्याने भांबावून सैरावैरा धावू लागली. मात्र, या अवस्थेत धावणार्‍या या महिलेला रेल्वेस्थानकावरील कुली, रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवान यांच्या सहकार्याने गाडीत निघून गेलेल्या तिच्या पतीला पुन्हा भेटण्यात यश मिळाले.  विशेष म्हणजे, या इराणी महिलेची भाषा समजत नसतानाही ‘गुगल’च्या मदतीने तिच्या बोलण्याचे भाषांतर करून आरपीएफच्या अधिकार्‍यांनी तिला सहकार्य केले.

इराणी महिला पती तहेरियान मिर्जा बेकीसोबत भारत भ्रणावर आली होती. मुंबई येथून ते हावड्याला जाण्यासाठी 12809 मुंबई-हावडा मेलमध्ये बसले. सकाळी 11 वाजण्याच्या सुारास ही गाडी नागपूरला आली. इराणी महिलेला भूक लागल्याने ती गाडीतून उतरली. मात्र, त्या फलाटावर खाद्यविक्रेता नव्हता. त्यामुळे ती दोन क्रमांकाच्या फलाटावर गेली. गाडीची वेळ झाल्याने गाडी सुटल्याने इराणी महिला नागपूर रेल्वेस्थानकावरच राहिली. गाडीत तिचा पती तहेरियान होता. तो पुढे निघून गेला. नव्या शहरात आणि गर्दीत ती महिला भांबावून गेली. इकडून तिकडे ती धावत होती. धीर खचल्याने ती रडू लागली. हा प्रकार एका कुलीच्या लक्षात आला. कुलीने तिला स्टेशन व्यवस्थापकाच्या कक्षात नेले. मात्र, स्टेशन व्यवस्थापकाला तिची भाषा समजत नव्हती. स्टेशन व्यवस्थापकाने ही माहिती आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना दिली. उपनिरीक्षक होतीलाल मीना आणि सहायक उपनिरीक्षक अभय बेदरकर यांनी तिला पोलिस ठाण्यात आणले. महिला इराणी असून, तिला पर्शियन भाषेशिवाय दुसरी भाषा येत नसल्याचे आरपीएफ जवानांच्या लक्षात आले. होतीलाल मीना यांनी ‘गुगल’वरील ‘ट्रान्स्लेटर अ‍ॅप’ची मदत घेतली. ती जी भाषा बोलत होती ते या अ‍ॅपला फीड करताच त्याचे हिंदीत भाषांतर होत होते. हिंदीत मजकूर टाकल्यानंतर तो मजकूर पर्शियनमध्ये भाषांतरित होत होता. त्यामुळे त्या महिलेला वाचता येत होते. प्रवासात तिची पतीसोबत चुकामूक झाल्याचे लक्षात आले.

आरपीएफच्या लक्षात हा प्रकार येईपर्यंत गाडी भंडार्‍यापर्यंत गेली होती. मीना यांनी गाडीतील मुख्य तिकीट निरीक्षक हरिक्रिष्णन यांच्याशी संपर्क साधला. हरिक्रिष्णन यांनी संपूर्ण गाडीत तहेरियानचा शोध घेतला. शेवटी तो एस 2 बोगीत 11 क्रमांकाच्या आसनावर चिंतामग्‍न अवस्थेत दिसला. मीना यांना ही माहिती समजताच त्यांनी स्वत:च्या मोबाईलवरून महिलेचा पतीसोबत संवाद करून दिला आणि तिच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. त्यानंतर तहेरियानला भंडारा येथे उतरवून दुसर्‍या गाडीने त्याला नागपुरात आणले. इराणी दाम्पत्याची भेट होताच त्यांनी कडाडून मिठी मारली. या इराणी दाम्पत्याने जवानांचे आभार व्यक्‍त करून मदत केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील प्रवासाला निघाले.