Wed, Apr 24, 2019 08:24होमपेज › Vidarbha › शहीद मेजर मोहरकर अनंतात विलीन

शहीद मेजर मोहरकर अनंतात विलीन

Published On: Dec 25 2017 7:22PM | Last Updated: Dec 25 2017 7:22PM

बुकमार्क करा

नागपूर : पुढारी ऑनलाईन

भंडारा जिल्‍ह्यातील पवनी येथील शहीद मेजर प्रफुल्‍ल अंबादास मोहरकर अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज लष्‍करी इतमामात त्यांच्या मुळ गावी पवनी येथे अंत्यसंस्‍कार करण्यात आले. शस्‍त्रसंधीचा भंग करून पाक सैन्याने काश्‍मीरमध्ये केलेल्या हल्‍ल्यात मोहरकर शहीद झाले होते. 

शहीद मेजर मोहरकर यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून जनसागर लोटला होता. दरम्यान, शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी सोनेगाव एअरफोर्स स्टेशनला आयएएफ एएन ३२ या विमानाने आणण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सैन्य दलातील आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मोहरकर यांना सलामी देण्यात आली. यावेळी शहीद मोहरकर यांच्या पत्नी अबोली मोहरकरही उपस्थित होत्या.

जम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग केला होता. भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर केलेल्या गोळीबारात एका मेजर दर्जाच्या अधिकार्‍यासह चार जवानांना वीरमरण आले होते. शहिदांमध्ये भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर या महाराष्ट्राच्या वीरपुत्राचाही समावेश आहे. शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन करत पाकिस्तानी सैनिकांनी केरी सेक्टरमध्ये गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर गोळीबार केला. या धुमश्चक्रीत पाकिस्तानी सैन्याचा मुकाबला करताना शनिवारी सायंकाळी मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले. 

प्रफुल्ल हे पवनी तालुक्यातील जुनोनाचे मूळ रहिवासी होते. त्यांचे आई-वडील शिक्षक-शिक्षिका असल्याने पवनीत राहिले. आठ वर्षांपूर्वी शहीद मोहरकर भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर पदोन्नती होऊन प्रफुल्ल मोहरकर मेजर पदावर पोहोचले. चार वर्षांपूर्वी मोहरकर विवाहबद्ध झाले होते.

नागपूर विमानतळावरून विशेष वाहनाने त्यांचे पार्थिव भंडारामार्गे पवनी येथे नेण्यात आले. मध्यरात्रीही पवनी येथे विशाल जनसमुदाय लोटला होता. आज पहाटे दीडच्या सुमारास संपूर्ण लष्करी इतमामात शोकाकुल वातावरणात  त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.