Sat, Jul 04, 2020 07:52होमपेज › Vidarbha › नागपूर : शेकडो नागरिक मोमीनपुरात उतरले रस्त्यावर

नागपूर : शेकडो नागरिक मोमीनपुरात उतरले रस्त्यावर

Last Updated: May 29 2020 12:09PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपुरातील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत केलेल्या काही भागातील नागरिक रस्त्यावर येऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत असल्याने जिल्हा प्रशासनासमोर नवीन पेचप्रसंग निर्माण झाला आहे. प्रतिबंधित क्षेत्र हटवा, रस्ता मोकळा करा, सील काढा, उपचार व खरेदीसाठी बाहेर जाऊ द्या' या आणि अशा अनेक मागण्यांसाठी सलग दुसऱ्या दिवशीही गांधीबाग झोनमध्ये नागरिकांनी रोष व्यक्त केला. मेयो रुग्णालयाजवळील भगवाघर चौकात मोमिनपुरा व आसपासच्या परिसरातील नागरिक रस्त्यांवर आले. त्यांनी मेयोजवळील मार्ग मोकळा करा, असा आग्रह धरला. यासोबतच विलगीकरण केंद्रात नेलेल्या नागरिकांना जेवण निकृष्ट दर्जाचे मिळते. त्यांना सोडून द्या, अशी मागणी करीत संताप व्यक्त केला.

अधिक वाचा : नागपूर : होम क्वारंटाईनवाल्यांसाठी आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक आदेश!

भगवाघर चौक व टिमकी कब्रस्तान परिसरात सुमारे अडीचशेवर नागरिक रस्त्यांवर आले. गेल्या आठवड्याभरापासून शहरातील प्रतिबंधित क्षेत्रामुळे नागरिक संतापले असून, हा रोष मोठ्या संख्येने गर्दीने रस्त्यांवर उतरून मनपाविरुद्ध व्यक्त होत आहे. दरम्यान, नागपुर मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. मुंढे यांनी सांगितले की, कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जेथे-जेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भात नियम मनपा आयुक्तांनी बनविले नाही तर केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असून कुठल्याही भूलथापांना नागरिकांनी बळी न पडता, नागरिकांनी नागरिकांसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

अधिक वाचा : नागपूर : कॉटन इंडस्ट्रीजला लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू

यासंदर्भात सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार यापूर्वी अखेरचा रुग्ण निगेटिव्ह आल्यापासून पुढील २८ दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र ठेवावे लागत होते. आता १७ मे रोजी आलेल्या नवीन गाईडलाईननुसार संबंधित परिसरात अखेरचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या दिवसापासून पुढील २८ दिवस ते क्षेत्र प्रतिबंधित राहील. या गाईडलाईननुसारच नागपुरात अंमलबजावणी सुरू आहे. हे निर्णय शासनाचे आहेत. विशेष म्हणजे यामागे वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारण आहे. २८ दिवसाला १४ आणि १४ अशा दोन भागात वैद्यकीय दृष्ट्या विभागण्यात आले आहे. पहिले १४ दिवस ॲक्टिव्ह आणि नंतरचे १४ दिवस पॅसिव्ह असे हे वर्गीकरण आहे. जो रुग्ण पॉझिटिव्ह आला त्या रुग्णाच्या परिसरातील ९५ टक्के लोकांना २ ते १४ दिवसात कोरोनाची लागण होऊ शकते. उरलेल्या पाच टक्क्यांपैकी अडीच टक्के लोकांना ० ते २ दिवसादरम्यान तर उर्वरीत अडीच टक्के लोकांना १४ व्या दिवसानंतर २८ व्या दिवसापर्यंत लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या अडीच टक्क्याच्या शक्यतेमुळे २८ दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित ठेवणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

अधिक वाचा : अमरावती : डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

या वैद्यकीय आणि वैज्ञानिक कारणांचा विचार करूनच केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन तयार केलेल्या आहेत. त्याचा विपर्यास कुणीही करू नये. या सर्व गोष्टी नागरिकांनी समजून घ्याव्या. नागपूर लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन कायमस्वरूपी ग्रीन झोनमध्ये यावा, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.