Wed, Jan 16, 2019 09:48होमपेज › Vidarbha › शेतकर्‍यांनीही टोकाची भूमिका घेऊ नये : गडकरी

शेतकर्‍यांनीही टोकाची भूमिका घेऊ नये : गडकरी

Published On: Jun 03 2018 8:11AM | Last Updated: Jun 03 2018 8:11AMनागपूर : प्रतिनिधी

जागतिक मंदीमुळे शेतीमालाला योग्य भाव मिळणे शक्य झाले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांची नाराजी साहजिक आहे. मात्र, या परिस्थितीतूनही मार्ग काढून शेतकर्‍यांना जगवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संयुक्‍तरीत्या प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ आणि जलवाहतूक तसेच जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात केले.

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवारी नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या बंद आंदोलनाबद्दल विचारले असता गडकरी म्हणाले की, शेतकर्‍यांच्या मागण्यांबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. त्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर उपाय केले जातील.

गडकरी यांनी यावेळी केंद्र सरकारने चार वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. केंद्र सरकार चांगले काम करत असतानाही जनतेत नाराजी का, या प्रश्‍नावर त्यांनी सरकारबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचा आरोप केला. संविधान बदलले जात आहे,  असा आरोप आमच्यावर केला जात आहे. मात्र, काँग्रेसच्याच काळात संविधानात सर्वाधिक बदल झाला, असेही ते यावेळी म्हणाले.

पवारांशी राजकीय चर्चा नाही

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माझ्यात साखरेच्या प्रश्‍नावर चर्चा झाली होती. त्या बैठकीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. तसेच सर्व विरोधक कमजोर झाले असून, त्यामुळे पुढील पंतप्रधानदेखील नरेंद्र मोदी हेच असणार आहेत, असा ठाम विश्‍वासही गडकरी यांनी व्यक्‍त केला.