Thu, May 28, 2020 23:10होमपेज › Vidarbha › आता शेतकरी सर्जिकल स्ट्राईक करणार

आता शेतकरी सर्जिकल स्ट्राईक करणार

Published On: Dec 05 2017 1:40AM | Last Updated: Dec 05 2017 1:28AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करीत दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याप्रमाणे अकोल्यात आपल्या मागण्यांकरिता शेतकरी सर्जिकल स्ट्राईक करणार. सत्तेवर आल्यानंतर भाजपने अर्थात आम्हीच वचन पाळले नसल्याने हे आंदोलन करावे लागत असल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी व्यक्‍त केली.

अकोला येथील स्वराज्य भवनात शेतकरी जागर मंचच्या वतीने कासोधा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख वक्‍ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जागर मंचचे अध्यक्ष जगदीश मुरुमकार होते. या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवीकांत तुपकर, ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे, गजानन अमदाबादकर, तात्या कृपाल, प्रशांत गावंडे, मनोज तायडे, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार बबनराव चौधरी, काशीराम साबळे, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, दादाराव पाथ्रीकर, श्रीकांत पिसे-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लढा उभारत असल्याची घोषणा करताना सिन्हा म्हणाले, हा लढा अकोल्यातून सुरू झाला आहे. देशभरातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटेपर्यंत हा लढा सुरू राहील. जाहीर केलेल्या हमी दरानेच संपूर्ण माल खरेदी करण्याची जबाबदारी सरकार टाळत आहे. 25-30 टक्केच माल घेणार, असे सरकार म्हणू शकत नाही. ‘नाफेड’सोबत याबाबत चर्चा करून सुधारणा करण्यास सांगितले. शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाचे मोल मिळाले पाहिजे. त्यांच्या उत्पन्‍नाची हमी सरकारने घेतली पाहिजे. तशी योजना या देशात असायला हवी.

हमी दराने शेतमाल खरेदी करण्यात सरकारला काय हरकत आहे, असा सवाल करून ते म्हणाले, दिल्लीतून निघालो तेव्हाच ठरविले होते, परतीचे तिकीट काढणार नाही. अनिश्‍चितता आहे, त्यामुळेच अकोल्यात अनिश्‍चित काळासाठी थांबणार आहे. तेव्हाच परत जाईल, जेव्हा शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून सरकार मार्ग काढेल.