होमपेज › Vidarbha › शेतकर्‍याने स्वतः चिता रचून घेतले पेटवून !

शेतकर्‍याने स्वतः चिता रचून घेतले पेटवून !

Published On: Jul 31 2018 10:03AM | Last Updated: Jul 31 2018 10:03AMनागपूर : प्रतिनिधी

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने स्वत:ची चिता रचून, स्वत:लाच पेटवून घेतल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. शेतात विष घेत स्वत:ला चितेवर जाळून घेतल्याच्या या खळबळजनक घटनेने सर्वांनाच धक्‍का बसला आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरापासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या सावखेड तेजन येथे घडली.

गजानन अर्जुन जायभाये (35) असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. त्याच्याकडे तीन एकर शेती होती; पण कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गजानन हापत्नी आणि पाच वर्षांच्या मुलासह राहत होता. गजानन याच्यावर महाराष्ट्र बँकेचे 70 हजार रुपयांचे पीककर्ज होते. त्यातच कर्ज माफीच्या गोंधळामुळे पुन्हा त्याला कर्ज मिळू शकले नाही. त्यामुळे उधार-उसनवार करून करून त्याने बी-बियाणे, खत घेऊन पेरणी केली होती. सततची नापिकी, पावसाची ओढ आणि कर्जबाजारीपणा मुळे घरप्रपंच चालवणे त्याला अवघड होऊन बसले होते. त्यामुळे तो खूप तणावाखाली गेला होता. यातूनच त्याने आत्महत्या केली, अशी माहिती ज्ञानदेव कारभारी जायभाये यांनी पोलिस ठाण्यात दिली.

यासंदर्भातील तक्रारीमध्ये ज्ञानदेव जायभाये म्हणाले की, 29 जुलैला सकाळीच गजानन शेतात गेला होता. औषध फवारणीसाठी विषारी कीटकनाशक, पंपाचा स्प्रे करण्यासाठी रॉकेल त्याने सोबत नेले होते. दरम्यान, फवारणी करण्याअगोदर शेतातील लाकडे गोळा करून त्याने स्वत:ची चिता रचली. सोबतच विषारी औषध घेऊन चितेवर स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली.