नागपूरः प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार आशीष देशमुख यांच्यासह निम्म्याहून अधिक आमदारांनी दांडी मारली. बौद्धिक वर्गाला हजेरी न लावणार्या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रतोद राज पुरोहित यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
दोन आठवड्यापूर्वी आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी राज्यातील भाजप सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्या प्रामुख्याने मांडला होता. वेगळा विदर्भ झाला नाही तर राजीनामा देईन, असा इशाराही त्यांनी दिला होता. याच मुद्यावरून ते आजच्या बौद्धिकाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा होती. आजच्या बौद्धिकाला एकनाथ खडसे, विनोद तावडे, रणजित पाटील हेही अनुपस्थित होते. काही लोकांनी आपल्या विभागात निवडणुका आहेत व वैयक्तिक कारण देऊन मला सांगितले होते, असे राज पुरोहित यांनी सांगितले. जे आमदार कोणतेही कारण न देता गैरहजर राहिले, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असेही पुरोहित म्हणाले.
नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील स्मृती मंदिरात बौद्धिक वर्गाचे आयोजन केले जाते. बुधवारीही आमदारांसाठी बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह काही आमदारांनी हेडगेवार स्मृती मंदिरात जाऊन रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी प्रत्येक आमदार व मंत्र्याला संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे ‘हिंदू आणि हिंदुत्व’ हे पुस्तक देण्यात आले.