Fri, Jan 18, 2019 06:47होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्री शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत : धनंजय मुंडे

मुख्यमंत्री शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत : धनंजय मुंडे

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 12:19AMनागपूर : प्रतिनिधी

मागील तीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या एकाही शिफारशी इतका भाव केंद्र सरकारने एकदाही दिला नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिकांच्या हमीभावाबाबत ऐतिहासिक वाढ म्हणून शेतकर्‍यांची दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत. असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

काल केंद्राने शेतमालाला वाढीव हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची स्तुती केली होती. त्यावर आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या स्तुतीवर जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे. तीन वर्षात राज्याने केलेली शिफारस आणि केंद्राने दिलेला हमीभाव याचे आकडे त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले.
उत्पादन खर्च आधारीत हमीभावाची शिफारस राज्य सरकार केंद्रास करीत असते. सन 2018-2019 मध्येच नव्हे तर मागील तीन वर्षात केलेल्या एकाही शिफारशी इतका भाव जाहीर केला नसताना मुख्यमंत्री ऐतिहासिक म्हणत आहेत. या अगोदरसुध्दा राज्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीही ऐतिहासिक असल्याचे म्हटले होते आणि आजही ते ऐतिहासिक म्हणत आहेत. निव्वळ घोषणा आणि वेगवेगळी नावे देण्यात हे सरकार माहीर असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे. धानाला 3270 रुपये शिफारस केली असताना केंद्राने 1750 दिले इतर पिकांच्या बाबतीतही असेच झाल्याचे ते म्हणाले आणि आकडे सादर केले.