Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Vidarbha › भाजपचा विजय लाजीरवाणा : धनंजय मुंडे 

भाजपचा विजय लाजीरवाणा : धनंजय मुंडे 

Published On: Dec 18 2017 7:44PM | Last Updated: Dec 18 2017 7:44PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

लाजिरवाणा पराभव आपल्याला माहित होता, परंतु, लाजिरवाणा विजय कसा असतो, हे मी गुजरातमध्ये झालेल्या भाजपच्या विजयावरून कळाला आहे. झालेला विजय निवडणुकीमध्ये मी लाजिरवाणा विजय पाहिला असल्याची प्रतिक्रिया देत गुजरातमध्ये लोकांनी भाजपची वाईट अवस्था केली आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिली. देशात भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल लागल्याने राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहेत. 

निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाल्यानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना तेथील जनतेने  साथ दिली. गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी काँग्रेसला मिळाली नसली तरी पक्षाला मिळालेल्या विजयी जागांमुळे  देशातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या निकालाने भाजपविरोधात नाराजीची लाट तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले.

पंतप्रधानांसह निम्मे केंद्रीय मंत्रिमंडळ, १३ राज्याचे मुख्यमंत्री, मदतीला सरकारी यंत्रणा, आणि प्रशासन असताना भाजपला जागांचा तीन अंकी आकडा गाठता आला नाही. भाजपचा विजय हा नैतिक पराभव आहे. काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली आणि गेल्या निवडणुकीपेक्षा २० जागा जास्त जिंकल्या आहेत. हा निकाल काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मत व्‍यक्‍त केले. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतदारांनी भाजपला दिलेला कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखविलेला विश्वास तसेच विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला दिलेली ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, "गुजरातमध्ये २२ वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असताना पक्षाला सुमारे ५० टक्के मतदारांची पसंती मिळाल्याने हा विजय महत्वाचा ठरतो. हिमाचलच्या रूपाने भाजपने १९ वे राज्य जिंकले आहे. गुजरात आणि हिमाचलप्रदेशमधील विजयाबद्दल या राज्यातील जनता व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करायला हवे". 

दरम्‍यान, गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपाने सातत्याने मांडलेला विकासाचा मुद्दा यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्‍त केली. 

ते म्‍हणाले 'या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि दोन्ही राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन.  विरोधकांनी जातीयवादावर भर दिला, पण गुजरातच्या मतदारांनी जातीयवादाला नकार दिला. केंद्र व राज्य सरकारचे काम तसेच पक्ष संघटनेच्या प्रभावामुळे हा विजय मिळाला आहे.'