Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Vidarbha › 8 लाख व्याजासह चुकते करण्याचे न्यायालयाचे आदेश 

8 लाख व्याजासह चुकते करण्याचे न्यायालयाचे आदेश 

Published On: Feb 14 2018 7:36PM | Last Updated: Feb 14 2018 7:36PMनागपूर : प्रतिनिधी 

जळगाव येथील बोदवड ते भूसावळ या मार्गावर रेल्वेतून प्रवास करताना अचानक खाली पडून मृत्यू झालेल्या संजय अवचरे या प्रवाशाच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने आठ लाख रुपये सात टक्के व्याजासह नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

संजय अवचरे हे बोदवड येथून भुसावळला जात होते. तेव्हा अचानक ते रेल्वेच्या दारातून खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृतकाची ओळख पटल्यानंतर प्रशासनाने इतर प्रक्रिया पार पाडली. दरम्यान, मृतकाची पत्नी कविता अवचरे व तिच्या मुलांनी रेल्वे दावा लवादाकडे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. अवचरे यांचा रेल्वे प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा अपघातात मृत्यू झालेला नाही. असे नमूद करीत लवादाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावला.

रेल्वे लवादाने दिलेल्या निर्णयाला कविता अवचरे व इतरांनी उच्च न्यायालयातील न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर आव्हान दिले. संजय अवचरे यांच्याकडे रेल्वे प्रवासाचे तिकीट होते. त्यामुळे रेल्वे प्रवासी म्हणून प्रवास करताना झालेल्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असून त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, असा दावा करण्यात आला.

दरम्यान, प्रवास करताना घडलेल्या दुर्दैवी घटनेला रेल्वे कायद्याच्या कलम 123 क आणि 124 अ मध्ये  नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु सदर दावा उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. संजय अवचरे यांचा रेल्वेतून प्रवास करतानाच मृत्यू झाला असल्याचे याचिकाकर्त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे रेल्वे कायद्याच्या कलम अ नुसार मृतकाच्या कुटूंयिांना आठ लाख रुपये सात टक्के व्याजदराने देण्यात यावेत, असा आदेश देत रेल्वे लवादाने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मीरा क्षीरसागर यांनी तर रेल्वेतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट यांनी बाजू मांडली.