Tue, Nov 20, 2018 21:47



होमपेज › Vidarbha › शिवस्मारकावरून रणकंदन !

शिवस्मारकावरून रणकंदन !

Published On: Jul 18 2018 2:23AM | Last Updated: Jul 18 2018 2:23AM



नागपूर : विशेष प्रतिनिधी

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उंचीवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली असताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याने संतप्‍त झालेल्या विरोधकांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याचा आरोप करीत, भातखळकर यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, विजय भांबळे आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजदंड पळविला. अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भातखळकर यांना यापुढे बोलताना शब्द जपून वापरण्याची तंबी दिल्यानंतर हा गदारोळ थांबला. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची उंची सरकारने कमी केल्याचा आरोप केला. मूळ पुतळ्याची उंची कमी करण्यात आली असून, चौथरा व तलवारीची उंची वाढविण्यात आली आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक असल्याचे ते म्हणाले. त्यावर अतुल भातखळकर यांनी हरकत घेत मूळ मुद्द्यांवर चर्चा न करता पृथ्वीराज चव्हाण हे भलताच विषय काढत आहेत, असे वक्‍तव्य केले आणि विधानसभेत गोंधळाला सुरुवात झाली. भातखळकर यांचे हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर आक्रमक झालेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ‘जय शिवाजी... जय भवानी’, ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत अध्यक्षांच्या असनावर चढले. आमदार शशिकांत शिंदे यांनी राजदंड उचलला, तर तो विजय भांबळे आणि अब्दुल सत्तार यांनी अध्यक्षांच्या टेबलवरून पळवून नेला. या गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले. 

भातखळकर यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही वक्‍तव्य केले नाही. आपण ‘भलताच’ हा शब्द शिवाजी महाराज यांना नव्हे, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल वापरल्याचे सांगितले. तसेच सभागृहाचा गैरसमज झाला असेल तर माफी मागतो, असे सांगितले. मात्र, त्यांच्या निलंबनासाठी विरोधकांचा गदारोळ सुरू होता. त्यावर शिवसेना आमदार शांत होते. मात्र, विखे-पाटील यांनी, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेले आज त्यांचा अवमान होत असताना गप्प आहेत, असा टोला लगावला आणि त्यांचा संयम सुटला. 

शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम म्हणाले, अतुल भातखळकर यांनी शिवस्मारकाला ‘भलता’ विषय संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्राची हात जोडून माफी मागावी, अशी मागणी केली. कदम यांच्या या मागणीमुळे भाजप आमदार संतप्‍त झाले. भाजप आमदार योगेश सागर हे तर अनिल कदम यांच्या दिशेने धावले. त्यांना शिवसेना मंत्री रवींद्र वायकर यांनी रोखले. मात्र, शिवसेनेच्या या हल्ल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विखे-पाटील यांनी भातखळकर यांना शिक्षा म्हणून किमान एक दिवस तरी निलंबित करण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी कामकाज तहकूब करून गटनेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर भातखळकर यांना यापुढे सभागृहात शब्द जपून वापरण्याची समज देत वादावर पडदा टाकला.