होमपेज › Vidarbha › गुप्तधनासाठी अमावास्येच्या रात्री केस कापून दिले चटके

गुप्तधनासाठी अमावास्येच्या रात्री केस कापून दिले चटके

Published On: Sep 02 2018 8:47AM | Last Updated: Sep 02 2018 8:47AMनागपूर : प्रतिनिधी

माहेरहून हुंडा आणण्यासाठी शारीरिक छळ तसेच गुप्तधन काढण्यासाठी विवाहितेचा बळी देण्याच्या प्रयत्न करण्यात आला. तसेच भानामतीच्या नावाखाली अमावस्येच्या रात्री विवाहितेचे केस कापून तिला चटके देण्यात आले. ही घटना अकोला जिल्ह्यात घडली. या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोहारा येथील संतोष तायडे याच्यासोबत 7 मे 2018 रोजी आस्टूल येथे पूजाचा विवाह झाला होता. विवाहामध्ये पूजाच्या आई वडिलांनी तिला संसारोपयोगी वस्तू व दागिने भेट दिले होते. मात्र त्यानंतरही माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांकडून पूजाचा छळ सुरू होता. यातूनच मग मला वाईट स्वप्न पडतात, असे सांगून पांढरा धागा व रुईची काडी गळ्यात घालण्यास दिली होती आणि रात्री डोळ्यात लिंबू पिळले होते. हा सर्व प्रकार पूजाने माहेरी सांगितला होता. 10 ऑगस्टला अमावस्या असल्याने सासरच्यांनी गुप्त धन काढण्याच्या उद्देशाने झोपेत असताना डोक्याचे केस कापून चटके दिले.

पूजाने हा घटनाक्रम माहेरी कळविल्यानंतर तिचे आई वडील व नातेवाईक लोहारा येथे पोहोचले व पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी भादंवि 498(अ),294, 506, 507 , 34 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोण्याला प्रतिबंध कायदा 3(1),(2) नुसार पती संतोष हिंमतराव तायडे, सासरा  हिम्मत तायडे, सासू बेबीताई हिम्मत तायडे, महादेव हिम्मत तायडे, कल्पना महादेव तायडे, नणंद दीपमला रमेश चराटे यांच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल केला.