Thu, Apr 25, 2019 06:17होमपेज › Vidarbha › विधवा महिलांना फसवणार्‍या लखोबा लोखंडेला अटक

विधवा महिलांना फसवणार्‍या लखोबा लोखंडेला अटक

Published On: Aug 27 2018 1:18AM | Last Updated: Aug 27 2018 12:52AMनागपूर : प्रतिनिधी 

घटस्फोटित आणि विधवांना फसवणा़र्‍या लखोबा लोखंडेला नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश माणिकलाल अग्रवाल असे या आरोपीचे नाव आहे. तो घटस्फोटित व विधवा महिलांना हेरून त्यांच्याशी विवाहाच्या अनुषंगाने संबंध निर्माण करायचा. आरोपीने आतापर्यंत तीन ते चार महिलांना फसवल्याचा प्रकार समोर आला असून त्याच्या अटकेनंतर आणखी महिला तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आकाश माणिकलाल अग्रवाल हा मूळचा मध्यप्रदेशातील आहे. तेथून तो वर्धा, गडचिरोली येथे दारूची तस्करी करायचा. तो एका ठिकाणी कधीच राहात नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून तो बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगरमध्ये राहायला आला होता. आरोपी ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर तो स्वत:चा प्रोफाईल अपलोड करायचा.

त्याठिकाणी विधवा व घटस्फोटित महिला हेरायचा व त्यांच्याशी संपर्क साधून लग्न करायची इच्छा व्यक्त करायचा. त्यांना भेटण्यासाठी बोलावून त्यांच्याशी जवळीक साधायचा. आरोपी एवढ्यावरच न थांबता श्रीमंत दिसणार्‍या महिलांशी बनावट लग्न करून त्यांची संपत्ती विकायचा व पसार व्हायचा. अशाप्रकारे त्याने आतापर्यंत दोन लग्न केले व तीन ते चार महिलांना फसवले असल्याची माहिती पुढे आली आहे.