Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › Vidarbha › वेगळ्या विदर्भासाठी प्रसंगी राजीनामाही देऊ : आशिष देशमुख

वेगळ्या विदर्भासाठी प्रसंगी राजीनामाही देऊ : आशिष देशमुख

Published On: Feb 14 2018 7:12PM | Last Updated: Feb 14 2018 7:12PMनागपूर : प्रतिनिधी

विदर्भाच्या अनुशेषाबद्दल अनेक समित्यांनी अहवाल सादर केले. पण, शासनाने या अहवालांकडे दुर्लक्ष केले आहे. तेव्हा मी वेगळ्या विदभार्साठी आधीपासूनच संघर्ष करीत आहे. येत्या एका वर्षात सरकारने वेगळा विदर्भ केला नाही तर, मी राजीनामा देण्यास मागेपुढे पाहणार नाही. जनतेने विदर्भासाठी गोंदिया-भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत विदर्भविरोधी सरकारला धडा शिकविण्याची तयारी दाखविण्याची वेळ आल्याचे मत नागपूर जिल्ह्यातील काटोलचे भाजप आमदार आशीष देशमुख यांनी व्यक्त केले. ते मविदर्भ आत्मबळ यात्रेफनिमित्त गोंदियात आले असता, पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड विरोध असून सुद्धा स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव संसदेत आणावा, अशी रास्त मागणी आमची असून मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका असून विदर्भातील विदर्भप्रेमी जनतेने या मागणीला भरघोस सर्मथन जाहीर करून भाजपच्या परड्यात मतांच्या रूपाने टाकले आहे. मात्र, राज्य व केंद्रातील सरकार विदर्भाच्या नावावार मते मागून सत्तेत आली, मात्र, आता विदर्भाच्या प्रश्नांना बगल देत जनतेला धोका देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

2010 मध्ये युवा जागर यात्रा अंतर्गत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी भाजपाने आंदोलनसुद्धा केले होते. विदर्भाच्या जनतेची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वतंत्र विदर्भ राज्याचे सर्मथन करेल, असे या पक्षांचे म्हणणे आहे. सर्व रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पार्टी, आंबेडकरी पक्षांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला सर्मथन दिले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या सर्मथनार्थ जनमत जाणून घेण्याच्या उद्देशाने विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे सार्वजनिक मतदान घेतल्या गेले. सरासरी 95 टक्के जनतेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या सर्मथनार्थ मतदान केले. यावरून असे लक्षात येते की, सर्वांगीण विकासासाठी विदर्भातील जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. तेव्हा सर्वांचे भले करायचे असेल. तर, वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.