Wed, Nov 21, 2018 16:12होमपेज › Vidarbha › रुग्णवाहिका अपघातात रुग्णासह चौघांचा मृत्यू

रुग्णवाहिका अपघातात रुग्णासह चौघांचा मृत्यू

Published On: Dec 05 2017 1:40AM | Last Updated: Dec 05 2017 1:32AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

नागपूर- अमरावती महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. 12 वर्षांच्या आजारी मुलाला नागपूरमधील मेयो रुग्णालयात नेणार्‍या रुग्णवाहिकेला विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने धडक दिली. या अपघातात 12 वर्षांचा मुलगा, त्याची आई आणि अन्य दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण अपघातात जखमी झाले आहेत.

अकोल्यातील या 12 वर्षांच्या मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने नागपूरमधील मेयो रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजारी मुलगा, त्याचे आई-वडील आणि अन्य दोन जण एका रुग्णवाहिकेतून नागपूरला जाण्यासाठी निघाले. सोमवारी पहाटे चार वाजता रुग्णवाहिका नागपूर-अमरावती मार्गावर असताना विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात मुलगा, त्याची आई आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. तर मुलाचे वडील या अपघातात जखमी झाले आहेत.

नागपूरमधील मेयो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या रुग्णालयात मुलाला उपचारासाठी नेले जात होते, त्याच रुग्णालयात आता त्या मुलाचे शवविच्छेदन होणार असल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे. धुक्यामुळे ट्रकचालकाला अंदाज आला नाही आणि हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आकाश भालेराव, विमल भालेराव, प्रमोद बंड, श्रीराम धरपावर अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.