Thu, May 28, 2020 16:27होमपेज › Vidarbha › जनतेची कामे न केल्यास त्यांना तुमची धुलाई करायला लावीन : नितीन गडकरी

जनतेची कामे न केल्यास त्यांना तुमची धुलाई करायला लावीन : नितीन गडकरी

Published On: Aug 18 2019 12:56PM | Last Updated: Aug 25 2019 1:56AM
नागपूर : प्रतिनिधी

येत्या आठ दिवसांत जनतेची कामे पूर्ण करा, अन्यथा त्यांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करायला सांगेन, अशी तंबी  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिली आहे. आपल्या वादग्रस्त वक्‍तव्यामुळे  वारंवार चर्चेत राहणार्‍या गडकरी यांच्या या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

परिवहन विभागाच्या बैठकीत गडकरी यांनी ही तंबी दिली. लघुउद्योग भारतीच्या येथील राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात स्वतः गडकरी यांनीच ही माहिती दिली. अधिकारी वेळेत कामे पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण  त्यांना अशी तंबी दिल्याचे ते म्हणाले. लाल फितीच्या कारभाचा जनतेला फटका सहन करावा लागत असल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखविली. 

गडकरी म्हणाले, परिवहन कार्यालयात मी शनिवारी बैठक घेतली. परिवहन आयुक्‍तही यावेळी उपस्थित होते. तुम्ही आठ दिवसांच्या आत लोकांच्या समस्या सोडवा; अन्यथा लोकांना कायदा हातात घ्यायला सांगून तुमची धुलाई करायला सांगेन, असे मी म्हणालो. न्याय न देणार्‍या व्यवस्थेला गुंडाळून फेकून दिले पाहिजे अशी शिकवण आमच्या शिक्षकांनी आम्हाला दिली होती. आपल्याकडे लाल फितीच्या कारभारामुळे व्यवस्था बिघडलेली आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. त्यातील काही सापडलेही आहेत. माझे त्यांना एकच सांगणे आहे. तुम्ही सरकारी नोकर आहात; पण मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे जनतेला उत्तर देण्यास मी बांधिल आहे.