Mon, Jun 17, 2019 18:18होमपेज › Vidarbha › वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास भरपाई 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास भरपाई 

Published On: Jul 13 2018 12:52AM | Last Updated: Jul 13 2018 12:21AMनागपूर : प्रतिनिधी

राज्यात वाघ, बिबट्या, रानडुक्‍कर, गवा (बायसन), अस्वल, हत्ती, लांडगा, तरस, कोल्हा, मगर व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यांमध्ये मनुष्यहानी व पशुधन हानी झाल्यास वाढीव दराने नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने गुरुवारी प्रसिद्ध केला. याबाबतची तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे. 1) व्यक्ती मृत झाल्यास 10 लाख रुपये, अपंग झाल्यास 5 लाख रुपये, गंभीररित्या जखमी झाल्यास 1 लाख 25 हजार रुपये व किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्चाकरिता प्रतिव्यक्‍ती 20 हजार रुपये. 

तसेच पशुधन मृत्यू, अपंग व जखमी झाल्यास पुढील प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. 1) गाय, बैल व म्हैस यांचा मृत्यू झाल्यास 40 हजार रुपये, 2) मेंढी, बकरी व इतर पशुधन मृत्यू झाल्यास 10 हजार रुपये, 3) गाय, म्हस व बैल या जनावरास कायम अपंगत्व आल्यास 12 हजार रुपये, 4) गाय, म्हस, बैल, मेंढी बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास 4 हजार प्रति जनावर याप्रमाणे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थ साह्याच्या 3 लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम 7 लाख रुपये त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट याप्रमाणे जमा करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने राधानगरी, आजरा, भुदरगड, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांमध्ये प्रामुख्याने हत्ती, गवारेडे व रानडुक्‍कर यासह अन्य वन्य प्राण्यांमुळे शेतीचे व मनुष्यहानीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर गेली 3 वर्षे सातत्याने शासनाकडे मागणी करत होते. 

याबाबत वेळोवेळी विधानसभेमध्ये देखील लक्षवेधी, प्रश्न यांच्या माध्यमातून सभागृहात चर्चा उपस्थित करण्यात आली होती. तसेच पावसाळी अधिवेशन नागपूर येथेही याबाबत पुरवणी मागण्यांच्या  चर्चेमध्ये देखील नुकसान भरपाई मिळावी, याकरिता मागणी करण्यात आली. याच अनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदी प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी व पशुधन हानी झाल्यास नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची घोषणा सभागृहात केली. 

यानुसार महसूल व वन विभागाने आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असून, यामुळे राज्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.