Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Vidarbha › पत्नीच्या मित्राने दिली जिवे मारण्याची धमकी..पतीने केली आत्महत्या

पत्नीच्या मित्राने दिली जिवे मारण्याची धमकी..पतीने केली आत्महत्या

Published On: Sep 06 2018 8:26PM | Last Updated: Sep 06 2018 8:00PMनागपूर : प्रतिनिधी

पत्नी मोबाइलवर तिच्या मित्रा सोबत बोलत असल्याच्या कारणावरून पतीचा पत्नीशी वारंवार वाद होत होता. त्यातच पत्नीच्या मित्राने जिवे मारण्याची धमकी दिल्याने चक्क पतीनेच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रवींद्र लालचंद मेश्राम असे या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी रोहित हरिदास वानखेडे आणि रवींद्र याची पत्नी संगीता मेश्राम या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रवींद्र लालचंद मेश्राम यांचा मृतदेह २६ ऑगस्ट रोजी हिंगणा हद्दीतील शिनका शिवार रेठी, राजकुमार गुप्ता यांच्या शेतातील विहिरीत तरंगतांना आढळला होता. याप्रकरणी फिर्यादी राजेंद्र लालचंद मेश्राम (33) यांनी दिलेल्या सूचनेवरून हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. 

रोहित हरिदास वानखेडे हा रवींद्र यांची पत्नी संगीता हिला नेहमी फोन करून तिच्यासोबत बराच वेळ बोलत होता. २२ ऑगस्ट दिवशी रात्री रोहित आणि संगीता हे दोघे फोनवर बोलत होते. पत्नीच्या रोजच्या या प्रकारामुळे त्रस्त पती रवींद्र मेश्राम यांचा पत्नीशी वाद झाला. हा सर्व प्रकार तिने आपला मित्र रोहितला सांगितला. यावरून रोहितने रवींद्र मेश्रामला  फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या या प्रकाराला त्रासून आणि पत्नीच्या मित्राने दिलेल्या धमकीच्या भीतीपोटी रवींद्र याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी फिर्यादी राजेंद्र लालचंद मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 306, 34 भादवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी रोहित वानखेडेला अटक केली आहे.