Mon, Sep 24, 2018 03:23होमपेज › Vidarbha › पाण्यावरून रणकंदन; गुजरातला एक थेंबही पाणी देणार नाही 

पाण्यावरून रणकंदन; गुजरातला एक थेंबही पाणी देणार नाही 

Published On: Dec 22 2017 9:17AM | Last Updated: Dec 22 2017 9:11AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

मोदी लाटेत आलेले राज्यातील भाजप सरकार महाराष्ट्राच्या हिश्श्याचे पाणी रोखण्याऐवजी ते गुजरातला सोडत असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गुरुवारी विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला. मात्र, हा आरोप फेटाळून लावत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दमणगंगा-पिंजाळ व पार-तापीनर्मदा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 10 हजार कोटी रुपये मिळणार असून त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, असे स्पष्ट केले.

विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राला पाणीपुरवठा करू शकणार्‍या दमणगंगा-पिंजाळ तसेच पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाबाबतचा प्रश्‍न मांडतानामहाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील पाणी वाटपाबाबत जुना करार रद्द करून नव्याने करार करण्याची मागणी केली.

त्यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उत्तर देताना, दमणगंगापिंजाळ प्रकल्पातून पाणी उपसा करणे शक्य नसल्याने गुजरातला देण्यात येत असल्याचे सांगितले. शिवतारे यांच्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य दिलीप वळसे-पाटील यांनी आक्षेप घेत राज्याच्या हिश्श्याचे पाणी गुजरातला देण्यात येत असल्याचे सांगितले. शिवतारे यांनी करार अंतिम झाला नसल्याचे सांगत महाराष्ट्राच्या मागण्या केंद्राला कळविण्यात आल्याची माहिती दिली. या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही.