जवान तस्‍लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार (video)

Last Updated: Jan 17 2020 9:14PM
Responsive image


वाशिम : प्रतिनिधी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) जवान तस्लिम सलीम मुन्नीवाले यांच्यावर आज शुक्रवारी (१७ जानेवारी) रोजी येथील बायपास जवळच्या मुस्लिम कब्रिस्थान मध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता. ‘अमर रहें, अमर रहें, तस्लीम भाई अमर रहें’ च्या घोषणा देत, साश्रुनयनांनी या वीरास निरोप देण्यात आला.  

अधिक वाचा : महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची गरज नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

येथील गवळीपूरा मधील मूळ रहिवासी तस्लीम मुन्नीवाले हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआयएसएफ) मध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना मंगळवारी (१४ जानेवारी) सहकारी कर्मचाऱ्याने त्‍यांच्यावर गोळी झाडली होती. यामध्ये त्‍यांचा मृत्‍यू झाला होता. सेवा बाजावतांना मृत्यू झाल्याची बातमी मिळाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली होती. मागील दोन दिवसांपासून सर्व तरुण मंडळी सर्व व्यवहार बंद ठेवून अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. 

अधिक वाचा : अभिमानास्पद! मराठमोळे हरीश साळवे आता ब्रिटनच्या महाराणीचे वकील

जम्मू काश्मीर येथून (दि.१६) च्या रात्री विमानाने जवान तस्लीम यांचे पार्थिव नागपुरात दाखल झाले. त्या नंतर अमरावती मार्गे पार्थिव कारंजा येथे आणण्यात आले. सर्वप्रथम मुन्नीवाले कुटुंबियांच्या घरी पार्थिव काही वेळ ठेवण्यात आले. त्या नंतर मुस्लिम विधीनुसार नमाज़े जनाजा अदा करण्यात आली. तसेच अंतिम दर्शनकरिता कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवरामध्ये पार्थिव ठेवण्यात आले होते. त्या नंतर शहरातील मुख्य मार्गावरून फुलांनी सजवलेल्या ट्रक मध्ये अंतीमयात्रा काढण्यात आली. 

अधिक वाचा : इस्रोची आणखी एक यशस्वी झेप; जीसॅट ३० चे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेटचे स्पीड वाढणार 

दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआईएसफ) व जिल्हा पोलिस प्रशासना तर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. नागरिकांनी स्वयंफुर्तीने आपली प्रतिष्ठाने तसेच सर्व व्यवहार बंद ठेऊन यात्रेत सहभाग नोंदवला. तसेच नगरपालिकेच्या शाळाही  बंद ठेवण्यात आल्‍या होत्‍या. नागरिकांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली. या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटणी, काँग्रेस नेते मो.युसूफ पुंजानी, नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाड़े, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, नायब तहसीलदार विनोद हरणे, ठाणेदार एस.एम.जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून त्‍यांना आदराजंली वाहिली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. जवान तस्लीम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वधर्मीय हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा : 'मनसे'च्या इशाऱ्यानंतर 'तेजस'मध्ये गांधी टोपी

जवान तस्लीम यांची हलाखीची परिस्थिती असतानाही शिक्षण घेत वर्दी घालण्याची त्यांची जिद्द कायम होती. २००८ मध्ये ते नोकरीत रुजू झाले होते. त्यांना दोन लहान मुले आहेत. त्यांच्या निधनाने शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सकाळी तस्लीम यांचे पार्थिव गावात येण्याअगोदरच नागरिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या तस्लीम मुन्नीवाले यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.