Fri, Aug 23, 2019 21:36होमपेज › Vidarbha › ब्लॉग : मराठी भाषेचे निग्रही आंदोलक: डॉ. वि. भि. कोलते

ब्लॉग : मराठी भाषेचे निग्रही आंदोलक: डॉ. वि. भि. कोलते

Published On: Jun 22 2018 3:54PM | Last Updated: Jun 22 2018 4:00PMअमरावती  : सचिन चौधरी

भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देवून गौरविलेल्या वि. भि. उर्फ भाऊसाहेब कोलते यांचा आज जन्मदिन. भाऊसाहेबांचा जन्म २२ जून १९०८ ला सत्यशोधक समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या घरात झाला. १९३१ ते १९४४ या कालखंडात अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, तर १९४४ ते १९६४ या कालखंडात नागपुरातील मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला.  त्यांनतर १९६६ ते १९७२ या काळात ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.

भोपाळ येथे १९६७ ला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांनी महाराष्ट्र भाषा सभा व विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्षपदही सांभाळले. १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महानुभाव पंथाचे ज्येष्ठ अभ्यासक तसेच महानुभावी व पौराणिक साहित्याचे व्यासंगी संशोधक अशी विशेष ओळख असलेल्या विभिंचे साहित्य विपूल आहे. ‘महात्मा रावण’ हे त्यांचे पुस्तक व लिळाचरित्राचे त्यांनी केलेले संपादन प्रचंड गाजले. महानुभाव तत्वज्ञान, महानुभावांचा आचारधर्म, श्रीचक्रधरचरित्र, महानुभाव संशोधन हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. मूर्तीप्रकाश, दामोदर पंडिताचे वाचाहरण, नरेंदाचे रुक्मिणीस्वयंवर, भास्कर बोरीकर यांची उद्धवगीता आणि शिशुपाल वध, म्हाईंभटाचे गोविंदप्रभूचरित्र, मुनिव्यासांची स्थानपोथी, रवळो व्यासांचे सैह्याद्रीमाहात्म्य या सर्व ग्रंथांचं साक्षेपी संपादन पाठचिकित्सा पध्दतीनं कोलते यांनी केलं आहे.

याबरोबरच चक्रधर आणि ज्ञानेश्वर, महानुभावांचे अवैदिकत्व ही त्यांची स्फुट लेखने प्रसिध्द आहेत. काही शिलालेख आणि ताम्रपटांचं वाचनही भाऊसाहेबांनी करून इतिहास संशोधनास मोलाची मदत केलेली आहे. २५० संशोधनात्मक लेख व ३५ पुस्तकांची ग्रंथसंपदा निर्माण करून त्यांनी मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान निर्माण केले आहे.

भाऊसाहेबांचा महानुभव धर्म व चक्रधर स्वामी याबाबत विशेष ऋणानुबंध होता. सर्वज्ञ चक्रधराने ज्याप्रमाणे मराठी भाषेकरीता मुद्दाम आग्रह धरला, अगदी त्याच पद्धतीने भाऊसाहेब कोलते मराठी भाषेच्या संवर्धनासाठी निग्रही होते. आजपासून सहा दशकांपूर्वी मराठी विद्यापीठाची संकल्पना डॉ. कोलते यांनी ज्या हिरिरीने प्रथम मांडली. त्यातून त्यांचा मराठी भाषेबाबतचा आग्रह विशेषत्त्वाने दिसून येतो. त्याकाळी क्रिकेट सामन्यांची रेडीओवरील समालोचन इंग्रजी वा हिंदीत असायचे. मात्र हे समालोचन मराठीतून व्हावे यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्याचं नेतृत्व दस्तुरखुद्द डॉ. वि. भि. उर्फ भाऊसाहेब कोलते यांनी आघाडीवर राहून केलं. महाराष्ट्र शासनाचे इंग्रजीत निघणारे जीआर मराठी भाषेत येण्यासाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला.

महानुभाव पंथ व महानुभावी साहित्य त्याकाळी वैदिक संस्कृतीच्या हितसंबंधांना तडाखे देणारे असल्याने महानुभाव विचारवंतांना व साहित्याला संपविण्याचा प्रयत्न तत्कालीन काळी अमानुषपणे करण्यात येत असे. त्यामुळे बहुतांश महानुभावी साहित्य नवनवीन सांकेतिक लिपी तयार करून जतन करण्याचा प्रयत्न ८०० वर्षापासून सुरू होता. १३ व्या ते १६ व्या शतकात अशा सांकेतिक लिपीत लिहीलेले अनेक महानुभावी साहित्य डॉ. वि. भि. कोलते यांनी उलगडून महानुभाव पंथाचा वैज्ञानिक व बुद्धीप्रामाण्यवादी विचारप्रवाह सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

भारतीय कृषी क्रांतीचे उद्गाते डॉ. पंजाबराव देशमुख व भाऊसाहेब कोलतेंचा विशेष स्नेह होता. त्यामुळेच विभिंच्या घरात प्रवेश करताच पंजाबरावांचे पाच फुट उंचीचे तैलचित्र दृष्टीक्षेपास येत असे. ज्या नागपुर विद्यापीठात कुलगुरू पदाकरीता डॉ. पंजाबराव देशमुख यांना सनातनी राजकारणामुळे पराभूत व्हावे लागले त्या नागपुर विद्यापीठाचा कुलगुरू होवून विभिंनी पंजाबरावांवर झालेल्या अन्यायाचा जणू बदलाच घेतला.

लिळाचरित्र या ग्रंथामुळे हिंदूधर्मियांच्या भावना दुखावतात अशा एका हिंदू याचिकाकर्त्यामुळे  व लेखक स्वत: महानुभावी नसल्याने त्यांना महानुभाव पंथावर लिहीण्याचा अधिकार नाही असे काही महानुभाव महंताच्या आग्रहामुळे वि भि कोलते यांनी संपादित केलेल्या लिळाचरित्रावर शासनाने बंदी घातली. आयुष्यभर ज्या महानुभाव पंथाकरिता संशोधन केले त्या संशोधनाचे फळ २५ हजारांचा दंड म्हणून भरण्याचा न्यायालयीन निकाल वयाच्या नव्वदीत भाऊसाहेबांच्या काळजात जखम करून गेला. या निकालानंतर अवघ्या चार महीन्यांनी साहित्य संशोधकातील मुकूटमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  डॉ.वि. भि. उर्फ भाऊसाहेब कोलते यांचे ८ एप्रिल १९९८ ला वृद्धत्वामुळे निधन झाले.