Mon, Jul 22, 2019 03:23होमपेज › Vidarbha › नोंदणी झाली नसतानाही संघाकडून नावाचा वापर

नोंदणी झाली नसतानाही संघाकडून नावाचा वापर

Published On: Jan 23 2018 8:55PM | Last Updated: Jan 23 2018 8:41PMनागपूर : प्रतिनिधी

संस्था नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी झालेली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्रासपणे या नावाचा वापर करीत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाचा वापर करण्यास मनाई करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकाकर्त्याने यापूर्वीदेखील संघाविरुद्ध वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. मून यांनी नव्याने दाखल केलेल्या याचिकेमध्ये संघाद्वारे नावाचा वापर सुरू असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. सध्या कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी झाली नसल्याचे कारण सांगून मून यांनी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संस्थेची नोंदणी मिळण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात अर्ज सादर केला होता. 4 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रीय शब्दावर आक्षेप नोंदवून मून यांचा अर्ज खारीज केला. त्या निर्णयाविरुद्ध मून यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ती प्रलंबित आहे. 

उच्च न्यायालयाने त्यावर सहायक धर्मादाय आयुक्‍त व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोटीस बजावली आहे. यानंतर 27 डिसेंबर 2017 रोजी मून यांनी  सहायक धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात नवीन अर्ज दाखल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती केली. 10 जानेवारीला सहायक धर्मादाय आयुक्‍तांनी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याचे कारण देऊन अर्ज निकाली काढला. मून यांनी त्यावर आक्षेप घेऊन पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. हा अर्ज निकाली काढताना सुनावणीची संधी दिली नाही व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोटीसही जारी केली नाही. दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत, हे लक्षात घेतले नाही, असे मून यांचे म्हणणे आहे. सहायक धर्मादाय आयुक्‍तांचा वादग्रस्त आदेश रद्द करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. मून यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्‍विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.