Thu, Apr 25, 2019 15:23होमपेज › Vidarbha › क्लस्टरमधून कोळीवाडे, गावठाणे वगळली!

क्लस्टरमधून कोळीवाडे, गावठाणे वगळली!

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 1:18AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाणेकरांचा दिवस गोड केला. ठाण्यात वादग्रस्त ठरलेल्या क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाणे वागळतानाच त्यांच्यासाठी मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच ठाणे शहारातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 2 एफएसआय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 

ठाणे शहरासाठी क्लस्टर योजना मंजूर करण्यात आल्यानंतर 44 ठिकाणी ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र या योजनेत कोळीवाडे व गावठाण क्षेत्राचाही समावेश करण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी आधीच एसआरए प्रकल्पांची प्रक्रिया सुरू झाली असतानाही तेथेही क्लस्टर योजना लागू करण्यात आली. त्यामुळे या योजनेबद्दल ठाणेकरांमध्ये संताप निर्माण झाला आहे. 

या प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली व महापालिकेचा सावळागोंधळ सभागृहात मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोळीवाडे व गावठाण क्षेत्र क्लस्टरमधून वगळण्याची घोषणा केली. त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनी कोळीवाड्यांचे सीमांकन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र बांधकाम नियमावली मंजूर करण्याची मागणी केली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करीत लवकरच ठाण्यातील कोळीवाड्यांचे सीमांकन करून त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येईल, असे सांगितले. ठाणे शहरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

या इमारतींच्या पुनर्विकासासाठी कमी एफएसआय मिळत असल्याने विकासक पुढे येत नाहीत. त्यामुळे या जुन्या इमारतींमध्ये रहिवासी जीव मुठीत घेऊन राहात आहेत. या इमारतींसाठी जर 2 एफएसआय दिला तर पुनर्विकासाला चालना मिळेल. त्यामुळे वाढीव एफएसआय देण्याची मागणीही आमदार संजय केळकर यांनी केली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्यामुळे ठाण्यातील 30 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.