Mon, Aug 19, 2019 13:22होमपेज › Vidarbha › चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीजनिर्मितीचे दोन संच बंद

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीजनिर्मितीचे दोन संच बंद

Published On: Sep 02 2018 8:17PM | Last Updated: Sep 02 2018 8:17PMनागपूर : प्रतिनिधी 

उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचे संकट असताना चंद्रपूर नजीकच्या इरई धरणाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची तहान भागवली. आता पावसाळ्याच्या दिवसात कोळसा टंचाईचे भीषण संकट वीज केंद्रावर ओढावले असून, केवळ बारा तास पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याने वीज केंद्र व्यवस्थापनाची तारांबळ उडाली आहे. दरम्यान,दोन दिवस ऑईलवर वीजनिर्मिती करण्याची वेळ आली आहे. या धरणातील ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच बंद करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सात संचांना सरासरी दररोज ५० हजार मेट्रीक टन कोळशाची गरज असते. मात्र, सध्या वीज केंद्राकडे केवळ 27 हजार मेट्रीक टन कोळसा उपलब्ध आहे. गेल्या एक महिन्यापासून कोळशाची अनियमितता जाणवत असताना मागील सात दिवसात गंभीर संकट उभे ठाकले आहे. मागील सात दिवसात दोन दिवस ऑईलवर वीजनिर्मिती करण्याची वेळ सीटीपीएसवर आली. परंतु, ऑईलवर नियमित वीजनिर्मिती करणे शक्य नसल्याने चंद्रपूरच्या वीज केंद्रातील वीज उत्पादन प्रभावित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कोळशाअभावी शुक्रवारी सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे 500 मेगावॅट क्षमतेचे संच तडकाफडकी बंद करावे लागले. यामुळे सद्यस्थितीत चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज केंद्र कोळसा नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला घुग्घूस, माजरी, बल्लारशा व वणी परिसरातील खाणींमधून कोळसा पुरवठा केला जातो. परंतु, मागील महिनाभरापासून कोळशाचा पुरवठा अनियमित होत असून गेल्या सात दिवसात कोळशाच्या रॅक उपलब्ध न झाल्याने ही स्थिती ओढावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वीज केंद्रात सात दिवसांचा कोळसा शिल्लक ठेवणे व्यवस्थापनाला बंधनकारक असताना संबंधित अधिकार्‍यांनी कोळसा पुरवठ्याबाबत चालढकल केल्यामुळे ही स्थिती ओढावली आहे. अधिकार्‍यांच्या नियोजनाअभावी चंद्रपूरच्या वीज केंद्रातील उत्पादन प्रभावित झाले असून आजघडीला केवळ 1410 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. कोळशाअभावी चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज केंद्र कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता असून मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्राला अंधारात राहावे लागण्याची भीती आहे.