Sun, Jul 21, 2019 08:20होमपेज › Vidarbha › विधिमंडळात हा आठवडाही ठरणार वादळी

विधिमंडळात हा आठवडाही ठरणार वादळी

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 09 2018 1:08AMनागपूर : प्रतिनिधी

गत आठवड्यातील तीन दिवसांच्या तोंडदेखल्या कामानंतर सोमवारपासून विधिमंडळाच्या दुसर्‍या आठवड्यातील कामकाजामध्ये नेमके काय घडणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात विरोधकांच्या भात्यात असलेले मुख्यमंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचाराचे अस्त्र काहीसे अयशस्वी ठरले आहे, तर शेतकरी समस्या, नाणार प्रकल्प, कायदा आणि सुव्यवस्था असे ठेवणीतले मुद्दे आतापर्यंत बाहेरच निघाले नाहीत. हे मुद्दे या आठवड्यात येणार, हे निश्‍चितच आहे; पण त्याचबरोबर शुक्रवारी नागपुरात आलेल्या मुसळधार पावसामुळे शहराची झालेली दुर्दशा आणि परिणामी विधिमंडळाचे स्थगित करावे लागलेले कामकाज हे एक आयते कोलित विरोधकांच्या हातात मिळाले आहे. त्यामुळेच सोमवारी सकाळी कामकाज सुरू होताच विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असल्याचे आणि हा आठवडाही वादळी राहण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या आठवड्यात नागपूरला झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचे अक्षरश: तुंबापूर झाले होते. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. शहरातील इतर भाग तर सोडाच; पण मंत्र्यांचे आणि विरोधी पक्षनेत्यांचे बंगले, इतकेच काय तर विधानभवनाच्या इमारतीतही पाणी शिरले आणि या प्रकारामुळे विद्युत पुरवठाही खंडित करून ठेवावा लागला. आजवर अधिवेशन काळात मुंबईची मुसळधार पावसाने तुंबई झाल्याचे प्रसंग कायम यायचे, अशावेळी भाजपवाले शिवसेना नेत्यांवर टीकास्त्र सोडायचे. सद्यस्थितीत नागपुरात झालेल्या प्रकाराने आता विरोधी पक्षांबरोबर शिवसेनाही आक्रमक होणार, हे निश्‍चित दिसते आहे.

नागपूरच्या मुसळधार पावसासोबतच शिवसेनेला नाणारचा मुद्दाही तापवायचा आहे. गत आठवड्यात एक दिवस विधानभवनच्या पायर्‍यांवर बसून शिवसेना आमदारांनी त्याची चुणूक दाखवून दिली. या आठवड्यात तो मुद्दाही पुढे रेटला जाईलच. त्याचबरोबर शेतकर्‍यांची फसलेली कथित कर्जमाफी, पुढील आठवड्यापासून दूध उत्पादकांचे सुरू होणारे आंदोलन, असे विविध मुद्दे सोबत घेऊन विरोधक तयारीला लागले आहेत.

16 जुलैला विधान परिषदेच्या निवडणुकाही आहेत. या निवडणुका खरे तर बिनविरोध व्हायच्या; पण भाजपने मैदानात उतरवलेला 12वा उमेदवार आणि रासपचे जानकर यांच्या उमेदवारीबद्दल निर्माण झालेला तिढा, यामुळे नेमके काय घडते, याकडे 9 जुलै रोजी सर्वांचेच लक्ष राहणार आहे. जर निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत, तर राजकीय वातावरण तापणार हे निश्‍चित आहे.

विधान परिषदेत चार नव्या सदस्यांचा शपथविधी

या आठवड्यात सोमवारीच विधान परिषदेत चार सदस्य नव्याने शपथ घेणार आहेत. त्यात  मुंबई शिक्षक व पदवीधर मतदार संघ, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघातून नुकतेच निवडून आलेले कपिल पाटील, विलास पोतनीस, किशोर दराडे आणि निरंजन डावखरे यांचा समावेश आहे.  यावेळी या चौघांचाही सभागृहात परिचयदेखील होणार आहे. यात लोकभारतीचे प्रमुख व लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील हे तिसर्‍यांदा शपथविधी घेतील. तर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले निरंजन डावखरे हे दुसर्‍यांदा शपथविधी घेणार आहेत.