Wed, Jul 15, 2020 13:19होमपेज › Vidarbha › नागपूर : गृहमंत्र्यांच्या घरापासून फक्त तीनशे मीटरवर दिवसा दरोडा टाकणारे २४ तासात जेरबंद!

नागपूर : गृहमंत्र्यांच्या घरापासून फक्त तीनशे मीटरवर दिवसा दरोडा टाकणारे २४ तासात जेरबंद!

Last Updated: Jun 03 2020 11:08AM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

नागपूरातील कार्यालयीन परिसर म्हणून परिचीत असलेल्या सिव्हील लाईन्स भागात दिवसाढवळ्या दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना अवघ्या २४ तासात मंगळवारी रात्री जेरंबद करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर हा मोठा दरोडा पडला होता. त्यामुळे दरोडेखोरांना शोधून त्यांना अटक करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

तीन बाईकवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडील १८ लाखांची रोख रक्कम लुटली होती. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास सिव्हिल लाइन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाजवळ घडली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थाना नजिक दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिस विभाग चांगलाच हादरला होता.

अमरावतीच्या नवीन भागात कोरोनाचा शिरकाव

नागपूरातील मानेवाडा बेसा मार्गावर असलेल्या ब्रिंक्स सव्‍‌र्हिसेस कंपनीचे श्रीकांत  इंगळे व सतीश धांडे हे दोन कर्मचारी त्यांच्याकडील १८ लाख रूपयांची रोख रक्कम जमा करायला नेहमीप्रमाणे बँकेत जात होते. नागपूरातील आमदार निवास परिसरात दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी या दोघांच्या मोटरसायकलला लाथ मारली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने श्रीकांत व सतीश खाली पडले. दरोडेखोरांनी दोघांना मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून सतीशच्या हातातील पिशवी हिसकावली व पसार झाले होते. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता साहू, सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजद्वारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला होता. अवघ्या चोविस तासातच सहा पैकी चार दरोडेखोरांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी योगेश विनायक सत्रमवार (३२), मंगेश वासुदेव पदमगिरवार (३३), आकाश मोरेश्वर धोटे(२१) आणि निक्की उर्फ निखील धनराज गोखले (२०) यांना ताब्यात घेतले आहे. या दरोडेखोरांकडून पोलिसांनी काही रोख रक्कम हस्तगत केली आहे. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, उपनिरीक्षक मयुर चौरसिया, राजकुमार त्रीपाठी, रविन्द्र गावंडे, शंकर शुक्ला, नरेन्द्र ठाकूर, रवी अहिर, प्रविण रोडे यांनी तपास करून चार आरोपींना अटक केली. तर यांचे दोन साथीदार मात्र फरार झाले आहेत. पोलिस त्यांचाही कसून शोध घेत आहेत.