Thu, Mar 21, 2019 15:33होमपेज › Vidarbha › विरोधकांची पायर्‍यांवरच घोषणाबाजी

विरोधकांची पायर्‍यांवरच घोषणाबाजी

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 12 2017 1:28AM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवरच आंदोलन आणि घोषणाबाजी केल्याने उद्यापासून पुन्हा एकदा सरकार आणि विरोधी पक्षांत सामना रंगणार, अशी चिन्हे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील घोळ, कापसावरच्या बोंडआळीमुळे शेतकर्‍यांची झालेली हजारो कोटींची हानी, विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा झालेला मृत्यू व राज्यभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिवेशन सुरू होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरून विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून घोषणा दिल्या.

आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांत काय झाले हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही गेल्या तीन वर्षांत काय केले, याचा हिशेब द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचेे नेते अजित पवार यांनी केली. एकीकडे विरोधकांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर हल्लाबोल केला असतानाच स्वतंत्र विदर्भवाद्यांनीही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आज पहिल्याच दिवशी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी येथील व्हरायटी चौकात निदर्शने झाली, तर  राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चाही नागपूर शहरात आला. आज विदर्भ बंदचा मात्र फज्जा उडाला.

विधानसभेचे माजी सदस्य गोविंदराव सरनायक, राजीव राजळे, संपतराव पाटील, मुसा अली मोडक, रामभाऊ तुपे, डॉ. शंकरराव बोबडे, डॉ. कुसुमताई कोरपे या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

यात्रेवेळी खा. सुप्रिया सुळे यांना अटक

जनआक्रोश हल्लाबोल पदयात्रेद्वारे नागपूरच्या हद्दीत प्रवेश करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली.
वाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी अडवणुकीची भूमिका घेऊन सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. ‘हल्लाबोल हल्लाबोल’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला.