Sat, Jan 19, 2019 01:27होमपेज › Vidarbha › अचलपूर येथे पोलिस शिपायाची हत्या; ३ आरोपी अटकेत

अचलपूर येथे पोलिस शिपायाची हत्या; ३ आरोपी अटकेत

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 7:35PMनागपूर : प्रतिनिधी

अचलपुरात येथील तीन सराईत गुन्हेगारांनी गस्ती घालत असलेल्या पोलिस शिपायास लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शांतीलाल पटेल असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी तिघां सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. केदार घनशाम चारपटे (वय-25), नितीन खोलापुरे (वय -२०), नयन मंडले (वय-20) तिघेही राहणार बुंदेलपुरा ,अचलपुर असे या आरोपीची नावे आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी की, केदार चारपटे, नितीन खोलापुरे, नयन मंडले हे तिघे बसस्थानकासमोरील एका हॉटेल समोर बसलेले होते. याचवेळी गस्तीवर असणार्‍या पोलिस वाहनातील महिला अधिकार्‍याने या तिघांना तेथून जाण्यास सांगितले. या महिला पोलिसाचा काटा काढण्यासाठी हे तीनही आरोपी महिला अधिकार्‍यांच्या शोधार्थ परतवाडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले असल्याची माहिती मिळाली. मात्र याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा असल्याने ते तेथून परत जयस्तंभ चौक परिसरामध्ये आले. 

दरम्यान परतवाडा येथून अचलपूर पोलिस स्टेशनला जाण्याकरिता शांतीलाल पटेल निघाले होते. याचवेळी या तिघां सराईतांनी शांतीलाल पटेल यांना अडवत त्यांचेकडून पैशाची मागणी केली. यावेळी पटेल यांनी आपण पोलिस असल्याचे सांगितले. पोलिस असल्याचे सांगताच या तिघां सराईतांनी कोणतीही तमा न बाळगता पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती पोलिसांना समजतात शांतीलाल पटेल यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.