Tue, May 26, 2020 13:58होमपेज › Vidarbha › यवतमाळ : दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य खाक

यवतमाळ : दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य खाक

Last Updated: Apr 04 2020 7:26PM
उमरखेड : पुढारी ऑनलाईन 

येथील ढाणकी रोडवर असलेल्या चार दुकानांना ३ एप्रिल शुक्रवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, ढाणकी रोडवर अब्दुल अजीज शेख इब्राहिम यांच्या मालकीची बिलाल सॉ मील (लाकूड कटाईची) आहे. याला शुक्रवार रात्रीच्या दरम्यान मोठी आग लागली. येथे असलेल्या लाकूड कटाई मशीन आणि संबंधित साहित्य व कच्चामाल असे एकूण सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या सॉ मिलला लागूनच असलेल्या धर्मेंद्र चव्हाण यांच्या चव्हाण फर्निचरच्या दुकानालाही आगीने आपले भक्ष्य केले. त्यामुळे दुकानातील फर्निचर आणि संबंधित असलेले सागवानी कच्चे साहित्य, सोफासेट, ऍल्युमिनियम स्लाइडिंग खिडक्या हे साहित्य जळून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. 

तसेच पीर खान अयुब खान यांच्या मालकीच्या सूफीयान भंगार दुकानातही या आगीने वेढले. यामुळे दुकानातील भंगार जळून सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर असलेल्या जावेद खान मोईन खान यांच्या पॉप्यूलर वेल्डिंग वर्कशॉपला आग लागून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याप्रकारे चार दुकानांना लागलेल्या या भीषण आगीमध्ये सुमारे १६ लाख ८५ हजारांचे नुकसान झाले असून व्यवसायावरच पोट असणाऱ्यांचे मोठी वाताहत झाली आहे. दरम्यान याआधी २५ मार्च रोजी रात्रीच्या वेळी एका अज्ञात व्यक्तीने सॉ मिलमधील कच्चामाल पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच आग विझवलयाने मोठा अनर्थ टळला होता. तसेच याप्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली होती. आज ही आग कशामुळे लागली, की लावली याचे कारण मात्र अद्यापही कळू शकले नाही.