Thu, Apr 25, 2019 08:15होमपेज › Vidarbha › पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षेच

पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षेच

Published On: Jul 19 2018 1:41AM | Last Updated: Jul 19 2018 1:18AMनागपूर : प्रतिनिधी

मुलांचे बालपण हिरावले जाऊ नये हे लक्षात घेता इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्याचे वय 6 वर्षांवरून 5 वर्षे करता येणार नाही, असे आज शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी  विधान परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे पहिली प्रवेशाचे वय सहा वर्षेच राहणार आहे. शिक्षक सदस्य दत्तात्रय सावंत यांनी पहिली प्रवेशाचे वय पाच वर्षे करावे, अशी मागणी करत नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते.

यासंदर्भात अनेक बालमानसोपचारतज्ज्ञांशी चर्चा केल्याचे सांगत, संपूर्ण आयुष्याचा विचार करता मुलांचा बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासही अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे भविष्यात निर्माण होणार्‍या स्पर्धेच्या नादात पाच वर्षांचा निर्णय हा घातक ठरेल, असे तावडे यांनी सांगितले. मुलांचे बालपण खुरडण्याचा अधिकार कोणालाही नाही. मुलांना सुरुवातीची काही वर्षे जास्तीत जास्त कौटुंबिक वातावरण मिळाले पाहिजे,  असे शिक्षणमंत्री म्हणाले.

दत्तात्रय सावंत यांनी या चर्चेत बोलताना अनेक राज्यांमध्ये पाच वर्षांत इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जातो मात्र महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांमध्येच सहा वर्षे वयाची अट आहे यामुळे राष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि स्पर्धांमध्ये संधी मिळताना  राज्यातल्या विद्यार्थ्याना अडथळे निर्माण होतात असं सांगितलं  राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, शेकापचे बाळाराम पाटील , काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी सावंत यांच्या मागणीला पाठिंबा दिला मात्र शिक्षण मंत्र्यांनी हे वय पाच वर्षे करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं.