Sat, Mar 23, 2019 12:05होमपेज › Vidarbha › नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्‍ला 

नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्‍ला 

Published On: Aug 28 2018 8:31PM | Last Updated: Aug 28 2018 8:28PMनागपूर : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून नातेसंबंधातल्या युवकाने २० वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्‍ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अमरावतीच्या बुधवारा परिसरातल्या नीळकंठ बगीच्याजवळ आज (सोमवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शिवानी सुनील वासनकर (रा. तारखेडा) असे जखमी युवतीचे नाव आहे. जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षय पुरुषोत्तम कडू (रा. शिरजगाव) या हल्‍ला करणार्‍या तरूणास खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवानी व तिची मैत्रिण आज (सोमवार) दुपारच्या सुमारास महाविद्यालयातून घरी निघाली होती. याचवेळी अक्षयने बुधवारा परिसरातल्या नीळकंठ बगीच्याजवळ शिवानीला गाठले आणि आपल्या जवळ असलेल्या चाकूने शिवानीच्या गळ्यावर जोरदार वार केला. या हल्यात शिवानीला वर्मी घाव लागल्याने ती रक्‍ताच्या थारोळ्ळ्यात खाली पडली.

ही घटना लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत हल्‍ला करणार्‍या अक्षयला पकडले. तर, शिवानीला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. या हल्यात शिवानीला वर्मी घाव लागल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, अक्षयला खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून एकतर्फी प्रेमातून त्याने शिवानीवर हल्‍ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.